Adhik Maas Shravan Mahina: मराठी वर्षातील अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू झाला आहे. यंदाच्या चातुर्मास महिन्याचे विशेष म्हणजे श्रावण महिना अधिक मास आला आहे. १८ जुलै २०२३ पासून अधिक श्रावण मास सुरू होत आहे. यामुळे चातुर्मासाचा काळ पाच महिन्यांचा झाला आहे. श्रावणात व्रत-वैकल्यांची रेलचेल असते. श्रावणातील प्रत्येक सण, व्रत-वैकल्यांचे महत्त्व वेगळे असून, त्या प्रत्येकाला काही ना काही विशेष अर्थ असल्याचे सांगितले जाते. यातच यंदाच्या श्रावणात दुर्मिळ योग जुळून आला असून, ४ एकादशी व्रत आणि दोन संकष्टी चतुर्थी व्रत करता येणार आहे. जाणून घेऊया...
मराठी वर्षात सुमारे २४ एकादशी येतात. मात्र, यंदा श्रावण महिना अधिक असल्यामुळे २६ एकादशी व्रत करण्याचे पुण्य लाभणार आहे. दुसरे म्हणजे अधिक महिन्यातील एकादशी व्रत श्रीविष्णूंना समर्पित असतात. पुरुषोत्तम महिन्यातील एकादशीला केलेले व्रताचरण हे विशेष शुभ पुण्यफलदायी मानले गेले आहे. अधिक महिन्यात केलेल्या पूजनाचे दसपटीने पुण्य लाभते, असे मानले गेले आहे. अधिक महिन्यातील एकादशीचे व्रत केल्यास महालक्ष्मीचे विशेष शुभाशिर्वाद प्राप्त होतात, असे म्हटले जाते. (Dates of Ekadashi Vrat in Adhik Shravan 2023)
अधिक मास म्हणजे काय? यंदा अधिक महिना कोणता? कधीपासून सुरू होणार? पाहा, महत्त्व व मान्यता
श्रावणातील ४ एकादशींची नावे आणि महत्त्व
अधिक महिना हा श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असेही संबोधले जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. पुरुषोत्तम महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशी या कमला एकादशी या नावाने ओळखल्या जातात. अधिक महिन्याच्या शुद्ध पक्षात २९ जुलै २०२३ पहिली एकादशी आहे. तर, वद्य पक्षात १२ ऑगस्ट २०२३ रोजी दुसरी एकादशी आहे. विशेष म्हणजे या दोन्ही एकादशी शनिवारी येत आहेत. निज श्रावणातील शुद्ध पक्षात येणारी पहिली एकादशी २७ ऑगस्ट २०२३ रोजी आहे. या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हटले जाते. तर, वद्य पक्षातील एकादशी १० ऑगस्ट २०२३ रोजी आहे. या एकादशीला अजा एकादशी म्हटले जाते. विशेष म्हणजे निज श्रावणातील दोन्ही एकादशी रविवारी येत आहेत. (Dates of Sankashti Chaturth Vrat Adhik Sharavan 2023)
१९ वर्षांनी श्रावणात दुर्मिळ योग; ८ श्रावणी सोमवार येणार, महादेवांच्या महापूजेने शुभच होईल!
अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी
अधिक महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी विशेष महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणारी चतुर्थी गणपती बाप्पाला समर्पित आहे. पैकी वद्य चतुर्थी संकष्ट चतुर्थी नावाने ओळखली जाते. सामान्यपणे वर्षभरात १२ संकष्ट चतुर्थी येतात. मात्र, यंदा अश्विन अधिक असल्यामुळे या वर्षातील संकष्ट चतुर्थींची संख्या १३ झाली आहे. यामुळे १३ संकष्ट चतुर्थी व्रतांचे पुण्य मिळू शकेल. अधिक श्रावणात येणारी संकष्ट चतुर्थी शुक्रवार, ०४ ऑगस्ट २०२३ रोजी आहे. तर, निज श्रावणात येणारी संकष्ट चतुर्थी रविवार, ०३ सप्टेंबर २०२३ रोजी आहे. दुसरीकडे, अधिक श्रावणातील शुद्ध पक्षात येणारी विनायक चतुर्थी शुक्रवार, २१ जुलै रोजी आहे. तर, निज श्रावणात शुद्ध पक्षात येणारी विनायक चतुर्थी, रविवार, २० ऑगस्ट रोजी असणार आहे.