- नीता ब्रह्मकुमारी मानवी मनाचा व त्यात असलेल्या अद्भुत शक्तींचा शोध लावण्याचा प्रयत्न विज्ञानाने केला आहे. आज या मनाची गती खूप तीव्र झालेली आपण पाहातो. म्हणूनच मनोरुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एका मिनिटांत २५ ते ३0 हजार तर पूर्ण दिवसात ४० ते ६० हजार विचार मनात येतात. जर याच गतीने विचार चालत राहिले तर हे मन आणखी कमजोर होऊन जाईल. म्हणून मनाची शक्ती वाढवण्यासाठी मननशक्तीचा उपयोग करणे आवश्यक आहे.शालेय जीवनात एखादे उत्तर लक्षात राहण्यासाठी पाठांतर करावे लागायचे. वारंवार त्याच ओळी मनात बोलत राहण्याचा अभ्यास केला जायचा. त्या अभ्यासाने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. पण जीवनात सफल व्हायचे असेल तर मननशक्ती वाढवण्याची आवश्यकता आहे. मनन अर्थात एखाद्या बाबीवर केलेले चिंतन. हे चिंतन चांगले किंवा वाईट दोन्ही प्रकारचे असूशकते.चिंतनाची दिशा जर सकारात्मक असेल तर मन शक्तिशाली होईल. पण तेच नकारात्मक असेल तर मन कमकुवत बनेल. कारण विचारांचा प्रवाह कोणत्या दिशेने वाहतो हे पाहाणे आवश्यक आहे.आज एखादा श्रेष्ठ विचार मनात आला, पण त्याला कर्मामध्ये आणण्याची शक्ती सर्वांमध्ये नसते. काहींचे विचार मनातच समाप्त होतात. एखादी व्यक्ती खूप गरीब असेल, तर तिच्यासाठी मोटारगाडी, बंगला या गोष्टी स्वप्नं असतात. पण एखाद्याने वारंवार ते प्राप्त करण्यासाठी विचार केला व स्वत:ला जाणीव करून दिली की मी हे सर्व काही मिळवू शकतो, तर नक्कीच या मनन करण्याने त्यांच्यामध्ये ती क्षमता येऊ शकते आणि तो जे हवे ते प्राप्त करू शकतो.मोबाइल एक महत्त्वाचे साधन आहे. पण तो रोज कित्येकदा चार्ज करावा लागतो. त्याचप्रमाणे एखाद्या महत्त्वाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचे असेल तर त्याचे मनन करून मनाची शक्ती वाढवण्याची आवश्यकता आहे.
अध्यात्मिक : मननशक्तीची किमया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 5:30 AM