- इंद्रजित देशमुखमानव्याच्या अखंड प्रतिपालनात माणसाशी माणूस जोडला गेला पाहिजे. तेही कुठं मनस्वी स्वीकृतीने, तर कुठे गरज भासल्यास तडजोड करून. अनेक रंगांच्या एकत्र मिश्रणात ज्याप्रमाणे एकत्र मिसळलेले सगळे रंग आपापला स्वरंगी गुणधर्म सोडून सगळे एकत्र मिसळून एका वेगळ्या रंगाची निर्मिती करतात. त्याप्रमाणे मानव्याच्या जोपासनेसाठी एकत्र येणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकाने आपापला वैयक्तिक अभिनिवेशटाकून सगळ्यांच्यात मिसळलं पाहिजे तरच मानव्याची जोपासना होऊ शकते. याच माणसाला माणूस जोडण्याच्या प्रक्रियेला अनुबोधून कविवर्य पी. सावळाराम म्हणतात,‘धागा धागा अखंड विणूया।विठ्ठल विठ्ठ मुखे म्हणूया।।’मुळात सगळ्यांच्यात आपलेपणा पाहून त्या आपलेपणास अनुसरून असलेलं आंतरिक स्नेह आपल्याकडून सहज व्यक्तव्हायला लागलं की समाजात एकात्मता नांदू लागते. आपल्या भोवतालच्या निसर्गातील विविधरंगी वसुंधरेच्या अंगावरील हे जे अक्षांशाचे आणि रेखांशाचे उभे आणि आडवे विणलेले आवरण आहे. ते विणताना त्या निर्मात्याने सगळ्या प्रभावी आणि अभावी गुणधर्माच्या घटकांना एका संगतीत आणले आहे. आम्ही आमच्या जगण्यात आपले हात आणि पाय यांच्या सकारात्मक कृतीने सगळ्यांची मनं एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या सगळ्या एकत्र येण्याने समाजात जे अर्धवट सुरक्षित आहे त्याची पूर्ण सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे, आपल्यातील कुणी मागे असल्याचं शल्य मनात धरून त्याला आपल्या बरोबरीने चालण्याची ताकद आणि उत्तेजना दिली पाहिजे. सुखाची आणि आनंदाची अनुभूती सहजीवी स्वरूपात सगळ्यांनी एकत्र मिळून घेतली पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेला बंधुत्वाचा चरखा फिरवून एकत्वाचे सूत्र विणण्याचा प्रयत्न करून आपण एक बनूया.
धागा धागा अखंड विणूया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 3:57 AM