- प्रा. बाळकृष्ण अंजनगावकरमानवता हा मनुष्याचा सर्वश्रेष्ठ अलंकार होय. भारतीय संस्कृतीत मानवतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वांवर सारखे प्रेम करणे, सर्वांना समानतेची वागणूक देणे म्हणजे मानवता. मानवतेवर समाजाचा दर्जा व समाजस्वास्थ्य अवलंबून असते म्हणून मानवता जोपासणाऱ्यांना भारतीयांनी संत-महात्मे असे संबोधून त्यांचा गौरव केलेला आहे. महानुभाव पंथ संस्थापक भगवान श्री चक्रधरस्वामींच्या चरित्राचा जर अभ्यास केला तर ते मानवतेचे महान पुरस्कर्ते होते हे लक्षात येते.
श्री चक्रधरस्वामींचा कार्यकाळ शके ११४५ ते ११९६ (इ.स. १२२३ ते १२७४) असा सुमारे ५१ वर्षांचा आहे. स्वामी मूळचे गुजरातमधले. बाराव्या शतकात भडोच (गुजरात) येथे प्रधानपदी असलेल्या विशालदेवाचा सुपुत्र म्हणजे हरिपालदेव. स्वामी हरिपालदेवाच्या रूपाने शके ११४५ला महाराष्ट्रात आले. श्री गोविंदप्रभूंनी ‘श्री चक्रधर’ असे संबोधून त्यांच्यात ज्ञानशक्तीचा संचार केला. तेव्हापासून स्वामींच्या कार्यास प्रारंभ झाला. जन्माने गुजराथी असूनही ते मराठी अनिवारपणे बोलत असत. गुजराथीबरोबरच संस्कृत भाषा येत असूनही त्यांनी जनसामान्यांसाठी मराठी भाषेचा अवलंब केला. १२व्या शतकात धार्मिक क्षेत्रातील हा फार मोठा बदल होता. कारण धर्मग्रंथ, धर्मकार्य व धर्मचर्चा या संस्कृतमधूनच चालत असत. संस्कृतला धर्मभाषेचा मान व प्रतिष्ठा होती.
स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रभर पायी भ्रमण केले. एके ठिकाणी ते राहात नसत. स्वत:चा मठ, पालखी, वैभव काहीही त्यांनी बाळगले नाही. ते नि:स्पृह होते. त्यांच्या काळात महाराष्ट्रात सर्वत्र यज्ञयाग, व्रतवैकल्ये, वर्णावर्ण भेदभाव, स्पृशास्पृश्यत्व, पुरोहितगिरी यांचे स्तोम माजलेले होते. समाज धर्मविचारांच्या जोखडाखाली दबला गेलेला होता. धर्म ठरवेल तो न्याय, नीती व समाजव्यवस्था अशी त्यावेळेची स्थिती होती.
जातीजातीत समाज विभागला गेलेला होता. विषमता वाढलेली होती. अस्पृशांना मंदिरात प्रवेश नव्हता. त्यांचे पाणवठे वेगळे होते. वस्त्या गावाबाहेर होत्या. भव्य यज्ञ, यज्ञात दिले जाणारे बळी, पशुहत्या, अनेक देवी-दैवतांची उपासना, तंत्र, मंत्रांना महत्त्व यामुळे भक्तिप्रधान धर्म लोप पावला होता. याचबरोबर विषमतेमुळे मानवता संपली होती. सर्वसामान्यांची आध्यात्मिक परवड झाली होती. स्रियांची अवस्था बिकट होती. सतीची चाल अस्तित्वात होती. बालवयात विवाह होत असत. अकाली वैधव्य आलेल्या स्रियांच्या जीवनात अंधार असावयाचा. त्यांना कोणत्याही प्रकारे धर्मकार्यात अधिकार नसावयाचा. स्रियांना स्रित्वाच्या नावाखाली हीन, उपेक्षित वागणूक दिली जात होती. त्यांचे जीवन अज्ञान, अंधश्रद्धा यामुळे परावलंबत्व यामुळे दु:खी -कष्टी बनलेले होते. समाजातली मानवता, प्रेम, समता संपलेली होती.
या विषमतेच्या व माणुसकी संपलेल्या काळात श्री चक्रधरस्वामींनी आपल्या कार्यास प्रारंभ केला. प्रारंभी कितीतरी वर्षे त्यांनी महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्या सरहद्दीवर असलेल्या सालबर्डीसारख्या आदिवासी भागात निवास केला. आंध्र, कर्नाटक प्रांतातही ते गेले. मात्र एके ठिकाणी राहिले नाहीत. महाराष्ट्राच्या सर्व भागात ते गेले. त्याकाळात ते दºयाडोंगरात गेले. गोंड लोकांमध्ये राहिले. त्यांच्या हातचे अन्न खाल्ले. त्यांना प्रेम दिले. ते ‘वन्यलोक स्वामींनी देवन्य देवत्व’ म्हणून प्रेमाने संबोधित असत. स्वामींनी त्यांना अहिंसा, भूतदया, प्राणीदयेची शिकवण दिली. याकाळात सालबर्डीला एका ‘सशा’चे शिकारीपासून रक्षण केले. त्या लहानशा प्राण्याला ‘महात्मा’ म्हणण्याइतपत स्वामींचे हृदय दयेने व मानवतेने भरलेले होते. त्यांनी वाघिणीची बछडे मांडीवर घेऊन खेळवली आहेत. ते निर्भय होते.
स्वामींच्या काळात जातीयतेची बंधने खूपच तीव्र होती. ही बंधने तोडणाºयास कठोर शिक्षा भोगावी लागत असे. वेदमंत्र कानी पडलेल्या हीनवर्णियांच्या कानात गरम शिसे ओतण्यापर्यंत कडक शासन केले जात होते. या भयानक विषमतेच्या काळात स्वामींनी पैठणजवळ असलेल्या ‘गावजोगेश्वरी’ येथे मातंगांना आपल्या मढात (मठ) प्रवेश दिला. त्यांच्या हातचा लाडू स्वीकारला. त्याच भक्तांना प्रसाद दिला. ‘तुम्ही महात्मे कीं गा; तुम्ही चतुर्विध - भूतग्रामा अभय देआवे’, अशी त्यांची परिवाराला आज्ञा होती. चातुर्वण्य-चरेद्भैक्षम्य’ असा समतेचा मंत्र त्यांनी परिवाराला दिलेला होता. ते सर्वसामान्यांमध्ये गेले. समाजासाठी जगणे हे खरे मोठेपणाचे लक्षण आहे. स्वामी महात्मापणाचे प्रत्यक्ष उदाहरण होते. दाकोखाती (लोहार) याला पंगतीचा मान दिला.
प्राणी हिंसा केलेली त्यांना मान्य नव्हती. ‘हिंसा न करावी’; ‘तुमचेनि मुंगी रांड न होआवी,’ असा अहिंसा धर्माचा विचार त्यांनी भक्तांना दिला.स्वामींच्या परिवारात स्रियांना सन्मानपूर्वक प्रवेश होता. कुटुंबवत्सल स्रियांबरोबरच अनेक दु:खी-कष्टी विधवा स्वामींच्या परिवारात राहून प्रत्येक धर्मकार्यात व धर्मचर्चेत भाग घेत असत. स्वामींनी स्रियांना आत्मसन्मान दिला. समतेची वागणूक देऊन स्रियांना जगण्याची नवी ऊर्जा दिली. त्यामुळेच महदंबेसारखी आद्य कवयित्री निर्माण झाली व ‘महदंबचे धवले’ हे आद्य स्रीकाव्य मराठी सारस्वताला लाभले. आऊसा, आबैसा, साधा, गौराईसा, रवई गोई, बाईसा अशा वेगवेगळ्या स्तरातील स्रिया स्वामींच्या परिवारात होत्या.
स्वामी धर्मशास्राचे जाणते होते. महानुभाव पंथाचे ते संस्थापक आहेत. कर्मकांडाऐवजी स्वामींनी त्यावेळच्या समाजाला एकेश्वरी अनन्य भक्तीचा मार्ग दाखवला. ‘नामस्मरण’ हाच मुक्तीचा सर्वश्रेष्ठ उपाय आहे असे सर्वसामान्यांना व ज्ञानीजनांनाही आत्मप्रत्ययास येणारे विचार त्यांनी दिले. यामुळे त्यांच्या परिवारात आद्य आचार्य नामदेवाचार्य, सावंगपंडित, इद्रभट, चांगदेव, जानोपाध्ये पं. म्हाईमभट्ट सराळेकर (आद्यचरित्रकार) यासारखे जाणते विद्वान सहभागी झालेले होते. ‘देओकाई, अनेक असति, देओतो एकचि कीं गा;’ असा विचार त्यांनी समाजाला दिला.
स्वामींनी समता, ममता, मानवता यांचा फक्त विचार दिला नाही तर विरोधाचा विचार न करताही त्यांनी मानवमुक्तीचे कार्य अविरतपणे केलेले आहे. ‘तुम्ही मारिता पुजिता समानचि होआवा;’ हे सूत्र त्यांच्या उदार हृदयाची साक्ष देते. ते जसे मानवतेचे प्रणेते होते तसे मराठी भाषेचे आद्यपुरस्कर्ते आहेत. त्यांच्या मराठी प्रेमामुळेच सुमारे ६५०० साहित्यकृती महानुभाव पंथीयांनी निर्माण केल्या आहेत.