Adhik Maas Shravan Mahina 2023: आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होत आहे. यंदा चातुर्मास विशेष मानला जात आहे. कारण यावर्षीच्या चातुर्मास महिन्यांत एक महिना अधिक आला आहे. मराठी पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो व ते वर्ष तेरा महिन्यांचे असते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. यंदा म्हणजेच २०२३ मध्ये श्रावण महिना अधिक असणार आहे. १९ वर्षांनी श्रावण महिन्यात अद्भूत दुर्मिळ योग जुळून आले आहेत. जाणून घेऊया... (Adhik Maas Sawan 2023)
चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिला श्रावण महिना येतो. श्रावण महिना महादेवांना समर्पित असल्याचे सांगितले जाते. भगवान शंकराच्या पूजेसाठी श्रावण विशेष मानला जातो. यावर्षीचा श्रावण खूप खास असल्याचे बोलले जात आहे. नियमित श्रावण महिन्यात ४ किंवा ५ श्रावणी सोमवार येतात. मात्र, यंदाचा श्रावण संपूर्ण दोन महिन्यांचा असणार असून, महादेवाचे पूजन, नामस्मरण, आराधना करण्यासाठी भाविकांना चार नव्हे तर आठ श्रावणी सोमवार मिळणार आहेत. (Adhik Maas Sawan 2023 Dates)
कधीपासून सुरू होणार श्रावण महिना? पाहा, अद्भूत योग
सन २०२३ मध्ये मंगळवार, १८ जुलै २०२३ रोजी अधिक श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. तर अधिक श्रावण महिन्याची सांगता बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. तर निज म्हणजेच नियमित श्रावण महिना गुरुवार, १७ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होत असून, निज श्रावण महिना शुक्रवार, १५ सप्टेंबर २०२३ रोजी संपत आहे. म्हणजेच अधिक आणि निज असे दोन महिने धरल्यास श्रावण महिना ५९ दिवसांचा असेल, असे सांगितले जात आहे. वास्तविक पाहता, अधिक मास असणार्या श्रावण महिन्याच्या पहिल्या महिन्यात श्रावणाशी संबंधित शुभ कार्ये होणार नाहीत. सर्व धार्मिक व शुभ कार्ये श्रावण महिन्याच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच शुद्ध श्रावण महिन्यात होतील. मात्र, शिवशंकर महादेवांची आराधना, उपासना, नामस्मरण अधिक श्रावण महिन्यात केले जाऊ शकेल, असे सांगितले जाते. (Sawan 2023 Dates)
तीन वर्षांनी अधिक महिना
पंचांगानुसार, सौर वर्ष ३६५ दिवस, ६ तास आणि ११ सेकंदाचे असते. पण चांद्रवर्ष ३५४ दिवस आणि ९ तासांचे असते. त्यामुळे दरवर्षी चांद्र वर्षात सौर वर्षापासून सुमारे ११ दिवसांचा फरक येतो. सौर वर्ष आणि चांद्र वर्षाचा ताळमेळ राखण्यासाठी एका अधिक मासानंतर दुसरा अधिक मास सुमारे ३२ महिने, १६ दिवसांनी येतो. सन २०२० मध्ये अधिक मास आला होता. आता सन २०२३ मध्ये अधिक मास आला आहे. चैत्र ते अश्विन महिने अधिक वेळा, तर कार्तिक व फाल्गुन क्वचित अधिक येऊ शकतो. पण मार्गशीर्ष, पौष, माघ हे महीने कधीच अधिक येत नाहीत. (Shravani Somvar 2023 Dates)
सन २०२३ मध्ये श्रावणी सोमवार कधी?
निज श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारी केली जाणारी व्रते, उपासना करता येणार आहेत. निज श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार, २१ ऑगस्ट २०२३ रोजी येत आहे. दुसरा श्रावणी सोमवार, २८ ऑगस्ट २०२३ रोजी आहे. तिसरा श्रावणी सोमवार, ०४ सप्टेंबर २०२३ रोजी आहे. तर शेवटचा म्हणजेच चौथा श्रावणी सोमवार, ११ सप्टेंबर २०२३ रोजी आहे. (Shravani Somvar 2023 Lord Shiva Mahadeva Puja Vidhi)
श्रावणी सोमवारी ‘असे’ करा महादेवांचे पूजन
श्रावणात सोमवारी सकाळी लवकर उठून स्नानादि कार्ये उरकावीत. स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. कोणत्याही शिव मंदिरात जाऊन किंवा घरी शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे. पंचामृत अर्पण करावे. यानंतर ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करत महादेवांवर जलाभिषेक करावा. याशिवाय महादेवांना पांढरी फुले, अक्षता, चंदन, धोतरा, ऋतुकालोद्भव फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा. महादेवांची आरती करून मनोभावे प्रार्थना करावी. यानंतर श्रावणी सोमवारची कथा अवश्य पठण अथवा श्रवण करावी. प्रसाद ग्रहण करावा.