लॉकडाऊन कडक-शिथिल होत दरदिवशी नियमावली बदलत आहे. त्यामुळे लग्नाळू मुलामुलींची आणि त्यांच्या पालकांची ओढाताण होत आहे, हे निश्चित! किती जणांना बोलवायचे, कोणता मुहूर्त साधायचा, लग्न थाटामाटात करायचे की साधेपणाने, असे अनेक प्रश्न, त्यात आणखी एका प्रश्नाची भर पडते, ती म्हणजे विवाह मुहूर्ताची! आपण प्रत्येक चांगले कार्य मुहूर्त पाहून करतो. विवाह तर आयुष्यभराचे मंगल करणारे कार्य, त्यासाठी शुभ मुहूर्त पाहणे उचित ठरते. अशात विवाह मुहूर्ताची वानवा असेल, तर लग्न लांबणीवर जाते. त्यामुळे जुलै महिन्यात असलेल्या अवघ्या ५ विवाह मुहूर्ताची संधी दवडू नका. मुहूर्ताची आणि तुमच्या तयारीची गाठ घालून मंगलकार्य पार पाडा.
जाणून घेऊया जुलै महिन्यातील पाच विवाह मुहूर्त : गुरु अस्तामुळे २०२१ च्या आरंभीच्या काळात विवाह मुहूर्त कमी होते. अडी अडचणी असल्यास काढीव मुहूर्त पाहून लग्न लावले जाते, परंतु पंचांगानुसार या महिन्यातील विवाह मुहूर्त हे पाचच! ते पुढील प्रमाणे -
१ जुलै : हिंदू पंचांगानुसार उत्तर भाद्रपदा हे नक्षत्र विवाहासाठी शुभ ठरेल. शिवाय गुरुवार असल्याने गुरुचे पाठबळ मिळून विवाहकार्य निर्विघ्नपणे पार पडेल.
२ जुलै : पाठोपाठ आलेले दोन्ही दिवस विवाहासाठी शुभ सांगण्यात आले आहेत. शुक्रवारी रेवती नक्षत्र असल्यामुळे दाम्पत्य जीवनाची सुरुवात करण्यासाठी ते शुभ मानले जाते.
६ जुलै : येत्या मंगळवारी अर्थात ६ जुलै रोजी विवाह मुहूर्त सांगितला आहे. मंगळवार अर्थात बाप्पाचा वार म्हणजे मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पडेल आणि रोहिणी नक्षत्र असल्यामुळे विवाह कार्य शुभ ठरू शकेल.
१२ जुलै : मघा नक्षत्र आणि सोमवार हा योग विवाहासाठी अनुकूल ठरणार आहे. सर्वच देव मंगल कार्यात आशीर्वाद देतात, गरज लागते ती केवळ ग्रहांचे पाठबळ मिळण्याची. १२ जुलै चा योग विवाहासाठी योग्य ठरेल.
१६ जुलै : या महिन्यातला शेवटचा विवाहमुहूर्त. त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त लग्न समारंभ ठरवले जातील. या दिवशी हस्त नक्षत्र असल्यामुळे पावसाची हजेरी असेल, पण त्याच बरोबर शुभेच्छांचा वर्षाव होऊन दाम्पत्य जीवनाची मंगलमयी सुरुवात होऊ शकेल.
या पाच मुहूर्तांनंतर येत्या चार महिन्यात विवाह मुहूर्त नाहीत. थेट नोव्हेम्बर महिन्यात तुळशी विवाहानंतर मंगल कार्याला प्रारंभ होईल. त्यामुळे विवाहेच्छुकांनी संधीचे सोने करावे, अन्यथा आणखी चार महिने ब्रह्मचर्य पालन करावे.