Ayodhya Dham: २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर रामललाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा जनसागर उसळला असून, अद्यापही गर्दी शमताना दिसत नाही. केवळ भारतातूनच नाही, तर परदेशातील अनेक देशांमधून पर्यटक, भाविक अयोध्येतील भव्य राम मंदिर पाहण्यासाठी, रामाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. यातच राम मंदिराचे काम लवकरच पूर्ण केले जाणार असून, अयोध्येतील १२५ मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
अयोध्येची ओळख केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक पुरती मर्यादित राहिली नसून, आता आधुनिक आणि स्मार्ट सिटी म्हणूनही होत आहे. रामनगरी अयोध्या केवळ सोलर सिटी म्हणून विकसित केली जात नाही, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटीच्या स्वरुपातही विकसित केले जाणार आहे. यासोबतच पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धा आणि तलावांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. रुंद रस्ते, उड्डाणपूल आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ शहराला बदलत्या अयोध्येची ओळख देत आहेत. अयोध्येतील ३७ मंदिरांना हेरिटेज स्वरुपात विकसित करण्यात आल्यानंतर आता १२५ मंदिरांच्या जीर्णोद्धाराची योजना आखली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जीर्णोद्धार होण्याऱ्या मंदिरांची यादी तयार?
भव्य राम मंदिराचे रुप साकारण्यापूर्वी अयोध्येतील ३७ जुन्या मंदिरांचा तसेच काही मठांचा कालापालट करण्यात आला. ही मंदिरे आणि मठ हेरिटेज स्वरुपात विकसित करण्यात येत आहेत. आता नव्या प्रस्तावात १२५ मंदिरांची यादी तयार करण्यात आली असून, त्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील धार्मिक व तीर्थक्षेत्रांसह पुरातत्त्वीय महत्त्वाची ठिकाणे, मठ, मंदिरे, तलाव, पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे यांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, पर्यटन विभागाच्या कृती आराखड्याचा प्रस्ताव अयोध्या धाम विकास परिषदेकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावात प्रकल्पांची यादी तयार करण्यात आली असून, अयोध्येतील ३७ मंदिरांना हेरिटेज स्वरुपात विकसित करण्याच्या योजनेसोबतच आता १२५ मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अयोध्या नगरी जगाच्या नकाशावर स्थापित व्हावे, असा उद्देश असल्याची माहिती पर्यटन विभागाचे उपसंचालक आरपी यादव यांनी दिली.