यज्ञ हा वातावरण शुद्धीसाठी असतो. विश्वशांतीसाठी शुद्ध वातावरणाची गरज असते. ती यज्ञाने साध्य होते. अस्वच्छ वातावरणात रोगाणूंची मोठ्या प्रमाणात वाढ होते. मूलत: रोगट वातावरणामुळे, शुद्ध हवेच्या कमतरतेमुळे, खेळत्या वायूचा संचार होत नसल्यामुळे, बाहेरून दूषित हवा आल्याने वा दूषित वातावरणाशी वा तसे वातावरण निर्माण करणाऱ्या रुग्णाशी संपर्क आल्याने होते. या रोगाणूंच्या संपर्कामुळे माणसांना विशेषत: लहान मुले, अशक्त वा नाजूक प्रकृतीची मुले यांना लवकर बाधा होते. यज्ञामुळे जी वातावरणनिर्मिती होते, ती वरील गोष्टींशी प्रामुख्याने संबंधित आहे.
ज्यांना मोठे यज्ञ शक्य नाहीत आणि आताच्या काळात ते अशक्य ठरत आहेत, त्यांनी नित्य यज्ञ घरातच करावा असे वेदात सांगितले आहे. अग्नीमध्ये सकाळ संध्याकाळ आहूति द्याव्यात असे अथर्ववेदात सांगितले आहे. या नित्य यज्ञालाच अग्निहोत्र असे म्हणतात.
ऊँ अग्निमिळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होतारम् रत्नधातमम् ।।
ज्याला वैदिक धर्माचं मूळ म्हटले जाते अशा ४ वेदांपैकी ऋग्वेदातील हा सर्वात पहिला श्लोक! एवढं वेदांमध्ये अग्नीला, अग्निपूजेला महत्त्व दिले गेले आहे. अग्निहोत्र म्हणजे काय, तर सोप्या भाषेत अग्नी मध्ये हवन, यज्ञ. अग्नी/सूर्य देवाला दिलेली आहुती म्हणजेच अग्निहोत्र. अग्निहोत्र नेहमी सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी केले जाते. अग्निहोत्र करताना अग्निकुंड, शेण्या, तूप, तांदूळ, तुपाची आहुती द्यायला पळी वापरल्या जातात.
अग्निहोत्र हा दैनंदिन केला जाणारा एक आहे. सूर्योदय व सूर्यास्तावेळी घरामधील वातावरण पवित्र करण्यासाठी अग्निहोत्र यज्ञ केला जातो. आयुर्वेदानुसार अग्निहोत्रामुळे अनेक व्याधींवर उतार मिळतो व आरोग्य वाढीला लागते.
घरातील मोजक्या दूषित वातावरणाला अग्निहोत्राने दूर सारता येते. स्वच्छ व शुद्ध वातावरणाचा परिणाम रोगाणूंचा नाश करण्यात तर होतोच, पण मन:शांति प्राप्त करून देण्यातही होतो. अग्निहोत्राचे जे मंगल परिणाम विशेषत: वातावरणात होतात, त्यामुळे जीवजंतूंची वाढ कमी झाल्याचे विज्ञानानेही म्हटले आहे.
अग्निहोत्राचा मानवी शरीरावर आरोग्यदायी परिणाम होतो. अग्निहोत्र नित्य सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी करावयाचे. तसे केल्याने वातावरणात असलेल्या संसर्गजन्य रोगांपासून बाधा होण्याची शक्यता कमी असते. इतकेच नव्हे तर वातावरणही शुद्ध असल्याने आनंददायक व शांतिदायक वाटते. हे परिणाम घडवून देणाऱ्या अग्निहोत्र विधीची तीन महत्त्वाची अंगे आहेत-
- सूर्योदय आणि सूर्यास्त याच वेळेत अग्निहोत्र झाले पाहिजे.
- आहूतीच्या विशिष्ट सामग्री जसे कोरडे तांदूळ आणि गाईचे तूप असले पाहिजे.
- विशिष्ट मंत्रांचे उच्चारण, ज्यामुळे वातावरणात विशिष्ट लहरी, कंपने निर्माण होतील.
असे हे अग्निहोत्र करण्यासाठी अतिशय सोपे आणि परिणामकारक आहे, त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.