>> ज्योत्स्ना गाडगीळ
एक व्यक्ती सांसारिक दु:खाचे हलाहल पचवून, आप्तस्वकीयांची बंडखोरी सहन करून, स्वच्छ चारित्र्याने आदर्श राजकारणाचा परिपाठ घालून देते, तेव्हा ती 'पुण्यश्लोक' पदाला पोहोचते. हा खडतर प्रवास केला लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी!
चौंढे नावाच्या गावात एका धनगर कुटुंबात अहिल्या जन्माला आली. तिचे माता पिता ईश्वरभक्त होते. त्यामुळे बालपणापासून तिच्यावर अध्यात्माचे संस्कार झाले. अहिल्या महादेवाची भक्ती होती. इतर मुली भातुकली खेळत असताना, ती मात्र वाळुचे शिवलिंग बनवून मातीचा बेलभंडारा उधळत असे.
अशी संस्कारीत सुकन्या तत्कालीन परंपरेनुसार बालवयातच होळकर घराण्याची सून झाली. अध्यात्माबरोबरच, शास्त्र व शस्त्र प्रशिक्षण घेऊ लागली. तिची जिज्ञासू वृत्ती हेरून तिच्या सासऱ्यांनी म्हणजेच मल्हारराव होळकर यांनी तिला राजकारणात सक्रिय ठेवण्यास सुरुवात केली. अहिल्येचा नवरा खंडेराव हा विलासी वृत्तीचा होता, परंतु तिच्या सहवासात राहून त्याच्यातही सुधारणा झाली. आपली निवड योग्य ठरल्याचा मल्हाररावांना आनंद झाला. अहिल्येचा संसार बहरला. मुक्ता आणि मालेराव अशी दोन अपत्ये झाली. मुक्ता आईच्या वळणावर तर मालेराव वडिलांच्या वळणावर होता.
सर्व काही सुरळीत असताना एक दिवस जाटांशी झालेल्या युद्धात खंडेरावाचा मृत्यू झाला आणि ऐन तारुण्यात अहिल्येवर वैधव्याचा प्रसंग ओढावला. तत्कालीन प्रथेनुसार ती सती जाऊ लागली, तेव्हा तिचे सासरे, मल्हारराव होळकर यांनी तिला हात जोडून विनवत म्हटले, `पोरी, तू सती जाऊ नकोस. माझी सून गेली आणि माझा खंडेराव माझ्या समोर उभा आहे असे मी समजतो. हे होळकर साम्राज्य तुला सांभाळायचे आहे. प्रजेला अनाथ करून जाऊ नकोस. सती जाण्याचा निर्णय रद्द कर!'
आपल्या पितासमान आणि गुरुस्थानी असलेल्या सासऱ्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून, लोकनिंदेची पर्वा न करता अहिल्येने प्रवाहाविरुद्ध जाऊन सती जाण्याचा निर्णय रद्द केला. जनतेमध्ये तिच्या निर्णयाबद्दल संमिश्र भावना होत्या. अहिल्येने पती निधनाचे दु:खं बाजूला ठेवून राज्यव्यवस्थेची धुरा हाती घेतली. सर्व राज्यकारभार अहिल्येच्या हाती सोपवून मल्हाररावांनी राम म्हटला. आधी पती, मग पिता यांचे दु:खं कमी होते न होते, तोच काही काळात तिला पुत्रवियोगही सहन करावा लागला. तिचा पुत्र मालेराव व्यसनाधीन असल्याने दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन अल्पवयात देवाघरी गेला. अहिल्या एकटी पडली होती, पण...
तिने वैयक्तिक समस्या राज्यकारभाराच्या आड कधीच येऊ दिल्या नाहीत. उत्तम न्यायव्यवस्था, परराष्ट्रीय धोरण, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, सैन्यव्यवस्था ती एकहाती उत्तररित्या सांभाळत होती. आदिवासी, नक्षलवादी लोकांशी चर्चा मसलत करून तिने त्यांनाही न्याय मिळवून दिला, त्यामुळे ती जनताही भारावून अहिल्येला `अहिल्यामाता' संबोधू लागली.
अशातच मुक्तेचा विवाह झाला, तिला पुत्र झाला. उतारवयात अहिल्या नातवात रमू लागली. पण तेही सुख क्षणभंगूर ठरले. तापाचे निमित्त होऊन नातू नत्थू देवाघरी गेला. तो धक्का सहन न होऊन त्याचे वडील गेले आणि पिता-पुत्र वियोग सहन न होऊन मुक्ता सती गेली. पाच मृत्यू पचवून अहिल्या एकाकी पडली.
याच प्रसंगाचा फायदा घेत राघोबा दादा होळकर साम्राज्य काबीज करण्यास आले. तेव्हा अहिल्येने व्यवहारचातुर्य दाखवून राघोबादादांना पत्रातून लिहिले, 'तुम्ही आमचा पराभव केलात, तर नवल नाही, पण आमच्या महिला सैन्याने जर तुमचा पराभव केला, तर तुम्ही कुठेही तोंड दाखवू शकणार नाही.' या शब्दांची जरब एवढी की राघोबादादा परस्पर पसार झाले.
होळकर आडनाव असलेल्या तुकाराम नावाच्या शूर योध्याच्या हाती होळकर साम्राज्याची सूत्रे सोपवून अहिल्या मातेने राज्यकारभारातून निवृत्ती घेतली. पूर्णवेळ ईश्वरकार्याला समर्पित केले. पुरातन मंदिरांची डागडुजी केली, जिर्णोद्धार केला, नद्यांवर घाट बांधले, न्यायालये उभारली, अन्नछत्रे सुरू केली, पूजापाठ, वेदपठन, वेदअध्ययनास प्रोत्साहन दिले. मुख्य म्हणजे हे सर्वकाही शासकीय खर्चातून नाही, तर स्वखर्चातून केले आणि आपल्या संपत्तीचे दान करून आपण वैरागी आयुष्य निवडले.
देवाला आणि दैवाला दोष न देता प्राप्त परिस्थितीचा सामना करून सामान्य स्त्री ते असामान्य सम्राज्ञी असा खडतर प्रवास पुण्यश्लोक अहिल्या मातेने केला. आज त्यांची जयंती, त्यानिमित्त त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन!