श्रीराम आणि श्रीकृष्ण हे भारतीय मनाचे चित्त वेधून घेणारे दोन प्रमुख चेहरे आणि कर्तृत्त्वशाली व्यक्तिमत्त्व! आज इतकी युगे लोटूनही त्यांच्या रूपाची मोहिनी जनमानसावर कायम आहे. म्हणूनच की काय AIE अर्थात आर्टिफिशिअल इंटीलिजन्सने म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेने आजवर उपलब्द्ध असलेल्या पुराणांच्या आधारावर २१ वर्षांचे श्रीराम कसे दिसत असतील याचा सुंदर चेहरा रेखाटला आहे.
वाल्मिकी रामायणापासून गीत रामायणापर्यंत श्रीरामाच्या रूपाची अनेक वर्णने आढळतील. AIE ने ज्या वयातले श्रीराम साकारले आहेत, ते श्रीराम २१ वर्षांचे आहेत. त्याच वेळेस त्यांचे स्वयंवर झाले होते. त्याचेही वर्णन गदिमा सीतामाईच्या नजरेतून करतात,
लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा!
रामचंद्र सावळे होते याचेही दाखले अनेक गाण्यांमधून मिळतात. मात्र AIE ने साकारलेले श्रीराम गौरवर्ण आहेत. यासाठी त्यांनी पुराणांचा आधार घेतल्याचे म्हटले आहे, तर आपणही पुराणातले वर्णन जाणून घेऊ. बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा स्तोत्राची रचना केली, त्यात सुरुवातीलाच ते रामाचे वर्णन करतात,
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्दद्पद्मासनस्थं ।पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ॥वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं ।नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम् ॥
जो आजानूबाहू आहे अर्थात ज्याचे हात गुढघ्याएवढे लांब आहेत, ज्याच्या खांद्यावर धनुष्य आणि सुसज्ज बाण आहेत, जो पद्मासनात बसलेला आहे, ज्यांनी पितांबर नेसले आहे, ज्यांचे नेत्र कमळासारखे आणि पाणीदार आहेत, ज्याचे वदन प्रसन्न आहे, जो भरून आलेल्या मेघासारखा सावळ्या वर्णाचा आहे, ज्यांच्या डाव्या मांडीवर सीतामाई बसल्या आहेत, ज्यांनी विविध आभूषणे घातली आहेत, मस्तकावर मुकुट घातलेला आहेत, अशी मूर्ती श्रीरामचंद्राची आहे.
बुधकौशिक ऋषींच्या शब्दांत केवढे सामर्थ्य आहे पहा, नुसते वर्णन वाचले तरी डोळ्यासमोर मूर्ती उभी राहते. अशातच AIE ने साकारलेली श्रीराम प्रतिमाही तेवढीच सुंदर आणि जिवंत आहे. रामभक्ती हा सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा प्रवास आहे. त्यामुळे श्रीरामांची ही छबी जरी मोहक असली तरी आपल्याला प्रवास निर्गुण स्वरूप अर्थात चराचरात सामावलेल्या रामाच्या दिशेने करायचा आहे हे ध्यानात घ्यायला हवे!