या वर्षीचा श्रावण मास अखेरच्या टप्प्यावर आला आहे. श्रावणातला शेवटचा आठवडा आणि अजा एकादशीचे व्रत. यंदा २९ ऑगस्ट रोजी अजा एकादशी (Aja Ekadashi 2024) आहे. या व्रताचे वैशिष्ट्य असे की हे व्रत केले असता आपले गतवैभव प्राप्त होते. ही श्रद्धा रूढ होण्यामागे आहे एक पौराणिक कथा.
या एकादशीशी राजा हरिश्चंद्राची कथा निगडित आहे. सत्यवचनी हरिश्चंद्र राजाला दुर्दैवाने राजत्याग करून विजनवास पत्करावा लागला. एवढेच नव्हे तर दिलेल्या शब्दाला जागून विश्वामित्र ऋषींची दक्षिणा देण्यासाठी स्वत:च्या पत्नीला म्हणजे राणी तारामतीला आणि मुलाला देखील विकावे लागले. एका ऋषींनी हरिश्चंद्राला हे अजा एकादशीचे व्रत करावयास सांगितले. त्याप्रमाणे हरिश्चंद्राने मनोभावे हे व्रत केले. त्यामुळे त्याला त्याचे गेलेले राज्य, पत्नी आणि पुत्र या साऱ्यांची पुर्नप्राप्ती झाली, अशी कथा आहे. या व्रताने मोक्षप्राप्ती होते अशी या कथेची फलश्रुती आहे.
हे व्रत इतर एकादशीच्या व्रतासारखेच आहे. सकाळी लवकर उठून स्नान करावे. देवपूजा करावी. 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा मंत्र १०८ वेळा म्हणावा. दोन्ही वेळेस उपास करावा. भूक लागल्यास फलाहार करावा, परंतु उपासाचे पदार्थ टाळावेत. देवाची मनोभावे पूजा करावी व आपल्या कार्यातील अडचणी देवाला सांगून त्यातून मार्ग दाखवावा अशी विनंती करावी.
या व्रताची सद्यस्थितीशी सांगड घालताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात- प्रियजनवियोग, अपघात, इतर संकटे, आजार, निसर्गाचा प्रकोप, व्यवसायातील आर्थिक चढ उतार, सुख दु:ख असे अनेक कटू अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी थोड्याफार प्रमाणात येत असतात. त्यावेळी येणाऱ्या नैराश्याचे मळभ दूर करण्यासाठी, मनाला उभारी येण्यासाठी राजा हरिश्चंद्राच्या वाट्याला आलेली पराकोटीची अवहेला, त्यातूनही पुढे त्याला मिळालेले गतवैभव या गोष्टी पुरेशा प्रेरणादायी असतात.
अजा एकादशीसारखे उपवास, व्रत केल्याने आशेचा किरण नैराश्याच्या काळोखापासून माणसाला सतत वाचवीत असतो. त्यामुळे मनोधैर्य मिळावे म्हणून ही एकादशी करावीशी वाटली तर जरूर करावी. शक्य असेल तर हे निमित्त साधून एखाद्याला व्यवसायात खोट आली असेल, कर्ज झाले असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन करावे, धीर द्यावा. शक्य असल्यास त्याला कमीपणा वाटणार नाही अशा तऱ्हेने मदतीचा हात पुढे करावा. तुमच्या ओळखीने त्याचा धंद्याचा पेच सुटणार असेल तर तशीही मदत करावी. एखाद्याच्या मालाला उठाव नसेल अथवा त्याने नवीनच व्यवसाय सुरू केला असेल तर त्या मालाची, वस्तूची आवर्जून खरेदी करावी. चारचौघांनाही त्याची खरेदी करावयास उद्युक्त करावे. मराठी माणसे वगळता इतर सर्व भाषिकांमध्ये असे सहकार्य केले जाते. आपण हा गुण अंगी बाणवून घेतला तर समाजपुरुषाला बरे वाटेल.