वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया. महाराष्ट्रात ही तिथी, सण म्हणून साजरी करतात. कौटुंबिक पातळीवर धार्मिक श्रद्धेने ह्या दिवशी सत्कार्य करतात. आपल्या पितरांविषयी कृतज्ञता म्हणून अनेक कुटुंबात पितरांना, पूर्वजांना, गुरूंना, उपकारकर्त्यांना तर्पण विधी करून त्यांचे स्मरण करतात. त्यात आपले व आपल्या कुटुंबियांचे पिता, पितामह, प्रपितामह, माता, मातामह, प्रमातामह या सर्वांचे स्मरण करून बोलवायचे व पिंडरहित श्राद्ध करायचे असते, म्हणजे नुसते, काळे तीळ, दर्भ, पाणी घेऊन तर्पण करावयाचे व दिव्याला गंध फूल अक्षता, हळद कुंकू वाहून (म्हणजे ते आपल्याला मार्गदर्शन करतात म्हणून) कावळ्याला, कुत्र्याला, गायीला गोग्रास, काकग्रास, व गरीबाला, किंवा अतिथीला पोटभर जेवण द्यायचे असते. तसे ते रोजचं द्यायचे असते, परंतु वर्षातून एकदातरी त्यांनी आपल्यासाठी केलेल्या अमोल कष्ट व असीम त्यागाचे हे ऋण मान्य करून व त्यांच्या सद्गुणांचेही स्मरण करून तसे आपणही वागून आपले जीवन समृद्ध करावे हा त्यामागील हेतू असतो.
या दिवशी केलेला जप, तप, दान, हवन, सेवा, मदत, सहकार्य, पुण्यकर्म अक्षय टिकते व शंभर पटीने वाढते असा पूर्वसूरींचा अनुभव व पक्की खात्री आहे. आपण विश्वास ठेऊन स्वतः अनुभव घ्यावा. सर्व वस्तु, मानव, दानव, देव, सृष्टी ही क्षय होत असतांना एखादी गोष्ट ती ही आवडती अक्षय राहिली तर आपल्याला हवीच असते, नाही का?
एवढ्या उकाड्यात विजनवसात असतांना पांडवांना तेथे सगळ्याच गोष्टींची वानवा असतांना, अन्नाची ददात मिटवण्यासाठी त्याच उष्णता देणार्या सौरशक्तीचा उपयोग सांगून ती “अक्षय थाळी” देणाऱ्या श्रीकृष्णाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. प्रतिकूलतेवरही मात करून तिला अनुकूल बनवायचे शास्त्रच होते ते!
अनेक ठिकाणी आजच्या दिवशी वसंतोत्सव साजरा होतो. चैत्र गौरीचे हळदीकुंकू समारंभ सांगताही ह्याच दिवशी होते. कच्च्या वा उकडलेल्या कैरीचे पन्हे, हरभऱ्याची वाटलेली डाळ, खिरापत देऊन ओल्या मोड आलेल्या हरभर्यांनी स्त्रिया एकमेकींच्या ओट्या भरतात व एकमेकींच्या संसारांचे सौभाग्य चिंतितात. अनेक लहानमोठ्या स्त्रियांची गाठभेटी होऊन विचारांचे आदानप्रदान होते व सुखदु:खांची चौकशी होते. अनेक मुलींची अशातूनच लग्नेही जुळतात तर काहींना ज्येष्ठ स्त्रियांकडून संसारातील अडीअडचणींवर तोडगे, उपाय, सल्ला, मार्गदर्शन मिळते तर काहींना आजीबाईंच्या बटव्यातील जडीबूटींचे हमखास रामबाण औषधही मिळते. सर्व स्तरातील आसपासच्या स्त्रिया मतभेद विसरून एकोपा वाढतो. पूर्वग्रह, गैरसमज दूर होऊन प्रेम वाढते. प्रचंड माहितीचा स्त्रोत खुला होतो.
असा हा सर्वांचे कल्याण साधणारा हा मुहूर्त सर्वांना लाभप्रद शुभप्रद ठरो ही सदिच्छा.