वैशाख शुद्ध तृतीयेस अक्षय्यतृतीया म्हणतात. हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. चैत्रागौरीच्या आंदोलनोत्सवाची या दिवशी सांगता होते. यंदा १४ मे रोजी शुक्रवारी अक्षय्यतृतीया आहे.
अक्षय म्हणजे अविनाशी, म्हणूनच या दिवशी केलेले होम, हवन, दान, स्नान, तर्पण, पूजा, जप आदि पुण्यकर्म अक्षय टिकते असे शास्त्र सांगते. ही शुभतिथी आहे, तशी पुण्यतिथीही आहे. त्यामुळे श्राद्ध दिवस मानून या दिवशी पितरांची पूजा केली जाते. गृहस्थ सपत्नीक पितृत्रयी (वडील, आजोबा, पणजोबा) मातृत्रयी (आई, वडिलांची आई, वडिलांची आजी) मातामहत्रयी (आईची आई, आजी, पणजी) यांना उद्देशून पिंडरहित श्राद्ध करतात. विस्तृत श्राद्ध नसल्यास पितरांसाठी म्हणून दक्षिणेसह उदवुंâभदान करतात. परंतु, सध्याच्या कोरोना काळात श्राद्ध विधी शक्य नसल्यास पितरांचे स्मरण करून त्यांच्याप्रती ऋणनिर्देश व्यक्त करावे.
वैशाख शुद्ध तृतीयेस पुनर्वसू नक्षत्रावर रात्रीच्या पहिल्या प्रहरी राहू मिथुन राशीत आणि सहा ग्रह उच्चीचे असताना माता रेणुकेच्या पोटी भगवान परशुरामांचा जन्म झाला म्हणून या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरी परशुराम जयंती साजरी करतात. या दिवशी प्रदोषकाळी परशुरामाची पूजा करून त्यास अर्घ्य देतात.
याच दिवशी अलवण तृतीया व्रत करतात. हे स्त्रीव्रत असून द्वितीयेला उपवास करतात. तृतीयेला गौरीची पूजा करतात. मीठ न घातलेले अर्थात अळणी पदार्थ सेवन केले जातात. हे व्रत भाद्रपद किंवा माघाच्या शुक्ल तृतीयेपर्यंत केले जाते.
सद्यस्थितीत हे व्रत फारसे केले जात नाही. परंतु आरोग्याच्या दृष्टीने पाहिले, आहारातून मीठ कमी केले तर हे व्रत नक्कीच आरोग्यदायी ठरेल. मिठाचा त्याग व्रताची सात्त्विकता अधिकच वाढवील यात शंका नाही.