अक्षय्य तृतीयेचा दिवस हा साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने खरेदी इतकेच दान धर्मालाही महत्त्व असते. तसेच या दिवशी माता लक्ष्मीची व भगवान विष्णूंची पूजा केली जाते. आजच्या दिवशी चैत्रगौर म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णा देवीची सासरी पाठवणी केली जाते. तिच्या पूजेचाच एक भाग म्हणून स्वयंपाक घरात शेगडीची पूजा करावी असे सांगितले जाते.
वास्तविक पाहता, पूर्वी आपली आई, आजी, पणजी रोज रात्री स्वयंपाक घर स्वच्छ करून दुसऱ्या दिवशी शेगडीला हळद कुंकू वाहून आणि रांगोळी काढून नंतरच स्वयंपाकाची सुरुवात करत असे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात या आवश्यक बाबींकडे आपले दुर्लक्ष होते, म्हणून सण उत्सवाच्या निमित्ताने या महत्त्वपूर्ण गोष्टींची उजळणी व्हावी असा शास्त्र संकेत आहे.
ही पूजा कशासाठी?
शेगडीची पूजा ही अन्नपूर्णेची पूजा आहे. ती आपल्याला कधीही अन्न धान्याची उणीव भासू देत नाही. ती अग्नीची पूजा आहे, ज्याच्या कृपेमुळे रुचकर जेवणाची चव आपल्याला चाखायला मिळते. म्हणून शेगडी स्वच्छ पुसून त्याच्याभोवती रांगोळी काढावी, हळद कुंकू वाहावे, अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे आणि ते पाठ नसल्यास देवीचा पुढील श्लोक आवर्जून म्हणावा-
या देवी सर्वभूतेषु क्षुधा रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।
ज्याप्रमाणे अन्नपूर्णेच्या कृपेमुळे आपली उपासमार होत नाही त्याप्रमाणे जे गरजवंत आहेत, त्यांना आपण यथाशक्ती मदत केल्यास अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील. तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेल्याला अन्न देणे यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही. आपण भले श्रीमंत नसलो, तरी आपल्या घासातला घास काढून देण्याइतका किंवा दुसऱ्यांसाठी दोन घास मिळवून देण्याइतका मनाचा मोठेपणा आपण दाखवला, तर आपला आनंद, समृद्धी, ऐश्वर्य अक्षय्य राहील यात वादच नाही!