Akshaya Tritiya 2024: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अक्षय्य तृतीयेला अनन्य साधारण महत्त्व आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जाणारा हा दिवस, साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. या दिवशी अन्नपूर्णा जयंती, नर-नारायण जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असते, असे सांगितले जाते. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे.
अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य' म्हणजेच न संपणारे असे मिळते, असा समज आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात. यंदा सन २०२४ मध्ये १० मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी काही कामे आवर्जून करावी, अशी मान्यता आहे. त्यामुळे यश, प्रगती, धनलाभ, सुख-समृद्धी प्राप्ती होऊ शकते, असे म्हटले जाते.
लक्ष्मी नारायणाचे करा पूजन
अक्षय्य तृतीयेला श्रीविष्णू आणि लक्ष्मी देवीची विधिवत पूजा करावी. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून श्रीविष्णूंची षोडषोपचार पूजा करावी. पिवळी फुले अर्पण करावीत. देवी लक्ष्मीला पांढरी व गुलाबी फुले अर्पण करावी. शक्य असेल तर कमळाचे फूल अर्पण करावे. तुपाचे ९ दिवे लावावे. श्रीविष्णू आणि लक्ष्मी देवीच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. तसेच आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात. नामस्मरण करावे. मनापासून प्रार्थना करावी.
स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीविष्णूंचे सहस्त्रनाम आणि श्रीसूक्ताचे पठण अवश्य करावे. ही दोन्ही स्तोत्रे म्हणणे शक्य नसेल, तर मग श्रवण करावे. असे केल्याने जीवनात धन, पद-पैसा, कीर्ती प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण अवश्य करावे.
हा उपाय करून पाहावा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी लाल कापडात नारळ बांधून ठेवा, नंतर विधिवत पूजा करा. पूजा केल्यानंतर नारळ कपाट किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने संपत्तीत चांगली वाढ होऊ शकेल. अडकलेला पैसा परत मिळू शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
अक्षय्य तृतीयेला दानाचे महत्त्व
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने दान व तर्पण अर्पण करणे. या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध करता आले तर त्याचे विशेष महत्त्व असून पितरांच्या नावाने दान केल्यास शाश्वत फळ मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळू शकतो, असे म्हणतात. या दिवशी केलेले दान अक्षय्य होते, असे भविष्यपुराणात आलेले आहे. या दिवशी पाण्याचे मडके, पंखे, छत्री, जवस, गहू, तांदूळ, वस्त्र यांचे दान करणे पुण्यदायी मानतात. परंतु दान हे सत्पात्री असावे, असे सांगितले जाते.
अरण्य कांडाचे पठण किंवा श्रवण करावे
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीरामचरितमानसच्या अरण्य कांडाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पठण शक्य नसेल तर श्रवण करावे. यामुळे केल्याने प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.