Akshaya Tritiya 2024: १० मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. हा दिवस मराठी वर्षातील अनेकविध महत्त्वाच्या सण-उत्सवांपैकी अनन्य साधारण महत्त्व असलेला दिवस आहे. या दिवशी केलेले शुभ कार्याचे अक्षय्य पुण्य लाभू शकते, अशी मान्यता आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी, वाहन, घर तसेच विविध गोष्टी आवर्जून खरेदी केल्या जातात. अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मी आणि श्रीविष्णूंची विशेष पूजा केली जाते. जाणून घेऊया...
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने दान व तर्पण अर्पण करणे. या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध करता आले तर त्याचे विशेष महत्त्व असून पितरांच्या नावाने दान केल्यास शाश्वत फळ मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळू शकतो, असे म्हणतात. या दिवशी केलेले दान अक्षय्य होते, असे भविष्यपुराणात आलेले आहे. या दिवशी पाण्याचे मडके, पंखे, छत्री, जवस, गहू, तांदूळ, वस्त्र यांचे दान करणे पुण्यदायी मानतात. परंतु दान हे सत्पात्री असावे, असे सांगितले जाते.
असे करा अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मी आणि श्रीविष्णूंचे पूजन
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. शक्य असल्यास लाल, पिवळा रंगाचा समावेश असलेली वस्त्रे परिधान करणे उत्तम मानले गेले आहे.यानंतर पूजेसाठीची जागा पूर्णपणे स्वच्छ करावी. घरात गंगाजल असल्यास ते पूजेच्या ठिकाणी शिंपडावे. एक लाकडी चौरंग घेऊन, त्यावर लाल वस्त्र घालावे. त्यावर लक्ष्मीची मूर्ती आणि विष्णूची मूर्ती स्थापित करावी. लक्ष्मी आणि विष्णूंना पंचामृत अर्पण करून षोडषोपचार पूजा करावी. त्यानंतर देवी लक्ष्मीला कमळाचे फूल आणि भगवान विष्णूला पिवळे फुले अर्पण करा. तसेच लक्ष्मी देवी आणि विष्णूंची आरती करावी. आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात. आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. आरती करावी आणि मनोभावे नमस्कार करून स्मरण करावे.
स्तोत्रे, मंत्र पठण किंवा श्रवण अवश्य करावे
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीविष्णूंचे सहस्त्रनाम आणि श्रीसूक्ताचे पठण अवश्य करावे. ही दोन्ही स्तोत्रे म्हणणे शक्य नसेल, तर मग श्रवण करावे. असे केल्याने जीवनात धन, पद-पैसा, कीर्ती प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण अवश्य करावे. तसेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीरामचरितमानसच्या अरण्य कांडाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पठण शक्य नसेल तर श्रवण करावे. यामुळे केल्याने प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
अक्षय्य तृतीयेच्या खरेदीचा शुभ मुहूर्त कोणता?
पुराणांमध्ये अक्षय्य तृतीया अतिशय शुभ तिथी असल्याचे सांगितले गेले आहे. सन २०२४ च्या अक्षय्य तृतीयेला रवियोग, धन योग, शुक्रादित्य योग, गजकेसरी योग, षष्ठ योग आणि मालव्य राजयोग तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व खूप वाढले आहे. अक्षय्य तृतीयेला तयार होत असलेल्या शुभ योगाचे महत्त्व सांगताना लक्ष्मी प्राप्तीसाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. याने अनेकविध फायदा मिळू शकतात, असे म्हटले जात आहे.
- लाभ चौघडिया मुहूर्त: सकाळी ७ वाजून १४ मिनिटे.- अमृत चौघडिया मुहूर्त: सकाळी ८ वाजून ५५ मिनिटे.- शुभ चौघडिया मुहूर्त: दुपारी १२ वाजून १७ मिनिटे.- चल चौघडिया मुहूर्त: सायंकाळी ०५ वाजून २० मिनिटे.