Akshaya Tritiya 2024: संपूर्ण मराठी वर्षांत विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी केली जातात. भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण-उत्सव किंवा व्रते ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या नाही, तर वैज्ञानिक, आरोग्याच्या दृष्टिनेही महत्त्वाची मानली गेली आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा दिवसही विशेष आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. यंदा १० मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाची सांगता याच दिवशी केली जात. या वेळी सुवासिनी हळदीकुंकू करून सौभाग्यवाण लुटतात.
अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न पावणारी. या दिवशी जप, होम, दान इत्यादी जे काही केले जाते, ते अक्षय्य होते, असे म्हणतात. या तिथीला ‘परशुराम तिथी’ असेही म्हणतात. या दिवशी अन्नपूर्णा जयंती, नर-नारायण जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असते, असे सांगितले जाते. या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केले जाते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की, या तिथीस करण्यात आलेले दान, हवन तसेच देव आणि पितर यांप्रती केलेली कार्ये कधीही व्यर्थ होत नाहीत, अविनाशी राहतात. आयुर्वेदातील औषधी वनस्पतींची लागवड या मुहूर्तावर केल्याने त्यांची वृद्धी होते, असे मानले जाते.
अक्षय्य तृतीयेस ‘इक्षु तृतीया’ असेही म्हणतात
जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक वर्षाच्या काळात अन्नपाणी ग्रहण केले नव्हते. व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांसनामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले. त्यानंतर त्या राजाच्या राज्यात अन्नधान्यासाठी कधीही क्षय पडला नाही. यामुळेच अक्षय्य तृतीयेस ‘इक्षु तृतीया’ असेही म्हणतात.
अक्षय्य तृतीयेला दानाचे महत्त्व
या तिथीला केलेले दान अक्षय्य राहते. या दिवशी भगवान विष्णूची पूजाही केली जाते आणि ती अक्षय्यी फलदायिनी असते, असेही सांगतात. हा सण उन्हाळ्यात येत असल्यामुळे या दिवशी पाण्याचा घडा तसेच उन्हासाठी छत्री, पायांत घालावयाचे जोडे दान करण्याची प्रथा आहे. सूर्यवंशातील भगीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजे गंगा आणली अशी कथा आहे. अक्षय्य तृतीयेस दान करावे, असा जो संकेत आणि परंपरा आपल्याकडे पाळली जाते. या दिवशी केलेल्या दानाचे महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणात वर्णिल्या आहेत, त्या माणसाच्या मनात दान करण्याची, त्यागाची भावना निर्माण व्हावी, रुजावी या हेतूने सांगितल्या आहेत. या सणाच्या निमित्ताने दानाचे आणि त्यागाचे महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनी केलेला आढळतो.
महाभारत लेखनास सुरुवात
अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य' म्हणजेच न संपणारे असे मिळते, असा समज आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात. या दिवशी महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला, अशी आख्यायिका प्रचलित आहे.
भविष्यपुराणात काय म्हटले आहे?
एक सदाचरणी, दानधर्म करणारा व्यापारी होता. दुर्देवाने त्याचा पडता काळ सुरू झाला. व्यापाऱ्याची स्थिती हलाखीची झाली. दारिद्र्य आले. त्याला कुणीतरी अक्षय्य तृतीयेचा महिमा सांगितला. पुढे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दानधर्म केला. त्या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला. खूप यज्ञ केले. राज्यसुख उपभोगले. पण अक्षय्य तृतीयेला त्याने केलेले पुण्य क्षय पावले नाही, अक्षय्य टिकले, अशी कथा भविष्यपुराणात आहे. वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले करतो ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. या दिवशी जो उपास करतो तो सुख-समृद्धीने संपन्न होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.