Akshaya Tritiya And Swami Samarth Goddess Annapurna: संपूर्ण मराठी वर्षात साडेतीन मुहूर्त असे सांगितले गेले आहेत की, त्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकते. त्यासाठी विशेष मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते, असे म्हणतात. साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अन्नपूर्णा जयंती, नर-नारायण जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असते, असे सांगितले जाते. अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णूंचे केलेले पूजन विशेष महत्त्वाचे मानले जाते. कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेले स्वामी समर्थ यांनी अन्नपूर्णा स्वरुप धारण केले होते, अशी एक कथा सांगितली जाते.
मध्य प्रदेशातील इंदूर येथे एक मठ असून, या मठात स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरुपात पूजन केले जाते. स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरुपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते. स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध असल्याचा प्रत्यत अनेकांना आला आहे. आजच्या काळातही स्वामींचे अनुभव आलेली माणसे हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतील. स्वामीकृपेचा कृतकृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात, वागण्यात आल्याचे प्रकर्षाने दिसूनही येते. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते. अनेक कथा, अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नसत, हेच स्पष्ट होते.
गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानले जाते
अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरांनुसार, घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानले जाते. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकऱ्यांना प्रसाद भोजन दिले, अशी एक कथा सांगतात. कोनाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे १०० सेवेकरी होते. दिवसभर चालून चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती. आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले. खुद्द स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामींना फलाहार दिला, पाणी दिले.
तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे
स्वामींनी फलाहार ग्रहण केला. स्वामी सर्वांना म्हणाले की, त्या आम्रवृक्षाखाली जा. श्रीपाद भटांसह आलेल्या सेवेकऱ्यांना वाटले की, तेथे कोणीतरी जेवण देईल. श्रीपादभटांना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती, विश्वास होता. श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकऱ्यांना घेऊन आम्रवृक्षाखाली गेले. तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपादभटांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की, आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती. अजून ती आलेली नाहीत. सूर्यास्त होत आला आहे. आता कोणी येईल, असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे.
स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरुपात सर्वत्र पूजन होऊ लागले
वृद्ध सुवासिनी महिलेने, शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपादभटांना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपादभट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले. श्रीपादभटांनी त्या सुवासिनी महिलेसही स्वामींकडे येण्याचा आग्रह केला. मात्र, तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते, असे म्हणून त्यांनी श्रीपादभटांना पुढे पाठवून दिले. श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांना जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोड्याचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरुपात सर्वत्र पूजन होऊ लागले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
अक्षय्य तृतीयेला स्वामी समर्थांच्या अन्नपूर्णा स्वरुपाचे स्मरण आणि शक्य असेल तर विशेष पूजन केल्यास केवळ स्वामींचा नाही, तर देवी अन्नपूर्णेचाही शुभाशीर्वाद प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जाते. शुक्रवार हा देवीला समर्पित वार असल्याने या दिवशी अक्षय्य तृतीया आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. या दिवशी लक्ष्मी देवीसह अन्नपूर्णा देवीचे केलेले पूजन, स्मरण, मंत्रोच्चार, जपजाप पुण्यफलदायी मानला गेला आहे.
||श्री स्वामी समर्थ||