यशस्वी होण्यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे. यश मिळवता येईलही, परंतु त्याला समाधानाची जोड नसेल, तर कुठे थांबावे, हे आपल्याला कळणारच नाही. आपण यशाच्या मागे धावत राहू. म्हणून एका तत्त्ववेत्याने यशाची व्याख्या आपल्या वयानुसार कशी बदलत जाते, त्याचे छान वर्णन केले आहे. तुम्ही, आम्ही, आपण सगळेच या परिस्थितून जात आहोत, जाणार आहोत. त्यामुळे यशाची परिमाणे आताच निश्चित केली, तर यशामागे धावताना धाप लागणार नाही आणि वेळोवेळी आयुष्याचा आनंदही घेता येईल. काय आहे ती व्याख्या, पहा...
पहिल्या वर्षी चालता येणे हे यश... चौथ्या वर्षी झोपेत गादी ओली न होणे हे यश... आठव्या वर्षी शाळेतून एकट्याने घरी परत येता येणे हे यश...बाराव्या वर्षी मित्र मैत्रिणी बनवता येणे हे यश... अठराव्या वर्षी स्वतःचा ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे हे यश.... तेविसाव्या वर्षी पदवीधर होणे, हे यश... पंचविसाव्या वर्षी पहिला पगार हातात घेणे, हे यश... तिसाव्या वर्षी जोडीदार मिळवून लग्न होणे हे यश... पस्तिसाव्या वर्षी बचतीला सुरुवात होणे हे यश... पंचेचाळिसाव्या वर्षी उत्साही राहता येणे हे यश... पन्नासाव्या वर्षी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देता येणे हे यश... पंचावन्नाव्या वर्षी न थकता काम करता येणे हे यश...
आता उलट प्रवास....
साठाव्या वर्षी न घाबरता ड्रायव्हिंग करता येणे हे यश... पासष्ठाव्या वर्षी निरोगी राहता येणे हे यश... सत्तराव्या वर्षी डोक्यावर कसलेही ओझे नसणे, हे यश... पंचाहत्तराव्या वर्षी जुन्या मित्रांची सोबत टिकवणे हे यश... ऐंशीव्या वर्षी घराचा पत्ता न विसरता घर गाठता येणे हे यश... पंच्यांशीव्या वर्षी गादी ओली होऊ न देणे हे यश... नव्वदाव्या वर्षी काठीचा आधार न घेताही चालता येणे हे यश...
यश हे अन्य काही नसून एक शृंखला आहे आपल्या अस्तित्त्वाची! ती आपला परीघ पूर्ण करते आणि आपण मात्र यशाची तुलना इतरांशी करत राहतो. आयुष्याचे हे सरळ सोपे तत्त्वज्ञान जेवढ्या लवकर आपल्या लक्षात येईल, तेवढे आपले आयुष्य सोपे आणि समाधानी होईल. यशस्वी जरूर व्हा, त्याला समाधानाची जोड द्या!