>> नरेन्द्रकुमार दिगंबर तळवलकर
अनेकदा शब्दांचे अर्थ वरकरणी सारखे वाटतात पण त्यामागचा भाव वेगळा असतो. जसे की दिसणे आणि पाहणे या दोन्ही क्रिया डोळ्यांच्याच असल्या तरी डोळ्यांना सगळ्या गोष्टी दिसतात पण निवडक गोष्टी आपण जाणीवपूर्वक पाहतो. तसाच सारखा वाटणारा शब्द म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक! हे दोन्ही शब्द भक्तिमार्गाशी संबंधित असले तरी त्यामागील भाव जाणून घेऊया.
जे कार्य आपल्या बहिर्मनाला सुखद अनुभव वा भाव देते ते सर्व धार्मिक या सदरात मोडते हे धार्मिक असे धार्मिक कर्म करत असताना आपल्या मनात प्रसंगी काम, क्रोध, लोभ, मोह, अहं भाव हे बहिर्मनातील भाव येत राहतात कारण हे सारे भाव विकार हे आपल्या बहिर्मनातच वास करुन असतात….!! उदा. पुजापाठ, आरती , उपवास , भजन , पारायण , कीर्तन किंवा इतर रिवाज हे सुरु असताना आपले मन हे कधी काम, कधी मत्सर, लोभ, अहंभाव यात एकीकडे मग्न असू शकते, थोडक्यात रोजच्या आयुष्यात मानवी मनाचे सारे भाव आहे तसेच ठेवून कोण्या एका सर्वोच्च शक्तिची केलेली आराधना म्हणजे धार्मिकता ….!! या धार्मिक आचारामध्ये जो आनंद मिळतो तो तसा क्षणीकच असतो …..!!
आता आध्यात्मिक भाव म्हणजे काय ते बघूया
आपल्या अन्तर्मनात जिथे केवळ आणि केवळ सद्सविवेक हा एकच भाव नांदत असतो त्या अंतर्मनाला सुखावेल अशी कर्मे करणे म्हणजे आध्यात्मिक आचार….!! इथे आपले सर्व विकारांनी ग्रस्त असलेले आपले बहीर्मन हे आपल्या अन्तर्मनातील सद्सविवेकात विलीन करण्याची क्रिया ही प्रामुख्याने केली जाते आणि जी प्राणायाम , ध्यान इ. ने साध्य होते….!! इथे धार्मिक आचारां मधील सोवळे , दिशा , पूजा साहित्य, इ.चा बडिवार नसतो तर केवळ विकारग्रस्त असे आपले बहीर्मन हे काही काळ तरी आपल्या रोजच्या आयुष्यातून बाजूला काढत या वर उल्लेख केलेल्या विकारांपासून थोडी मुक्तता मिळविणे हा उद्देश असतो…..!! आणि असे कल्याने आपल्याला जो आंनंद मिळतो, जे समाधान मिळते ते चिरकाल टिकणारे असते …..!!
हा फरक असूनही या दोन्ही शब्दांना समान महत्त्व आहे. कारण धार्मिकतेचा प्रवास अध्यात्माकडे नेणारा आहे. धार्मिक गोष्टी केल्यामुळे मन अध्यात्माकडे झुकू लागते आणि ईश्वरी अनुभूती घेता येते. उदाहरण द्यायचे झाले तर आपण जप करतो, त्यात १०८ मणी समाविष्ट असतात. आपण प्रत्येक मणी ओढताना देवाचे नाव घेतो. पण ते घेत असताना १०८ वेळा मन ईश्वर चरणी रुजू होईलच असे नाही, पण एक क्षण असा येतो जेव्हा आपले मन आणि उच्चारत असलेले नाम एकरूप होते आणि भक्ती घडते. म्हणजेच जप करणे हा धार्मिक उपचार झाला तर तादाम्य पावणे ही अध्यात्मिक स्थिती झाली. यावरून लक्षात येईल, की ईश्वरसेवेत रुजू होण्यासाठी, मन गुंतवण्यासाठी हे दोन्ही शब्द, त्यामागचा भाव आणि त्याच्याशी जोडलेल्या संकल्पना व नियम हे आवश्यकच आहेत!