बा.भो. शास्त्री
एका राजाच्या तीन मूर्ख मुलांना विष्णुशर्माने गोष्टी सांगून घडवलं, जातक कथा, बृहद कथा, इसापनीती यांनी सृजाण माणूस घडवला आणि गोष्टीतून सुख वाटलं. संपूर्ण इंद्रियांसह आत्म्याला जे बरं वाटतं त्याला सुख म्हणतात. दुसरा शब्द आहे श्रेय, त्याचा अर्थ अधिक सुख देणारा, मंगलकारक, सौभाग्यवर्धक किंवा कल्याण. तिसरा शब्द शृंगार आहे. शृंगार कुणाला आवडत नाही? आपण सुंदर दिसावं, दृश्यमान यश मिळावं, किर्ती लाभावी असं वाटतं असतं. गोष्ट काळजापर्यंत भिडणारी असावी. सांगताना रसानुकुल चेहरा असावा व आल्हादकारक व सुसंवादी असावी. एखादी गोष्ट माणसाचं जीवन घडवते ती या गोष्टीत दडली आहे.
साखर, पत्ती, दूध असल्यावर चहा होतो तसं सुख, श्रेय व शृंगार असेल तर गोष्ट होते. नसता अरण्यरुदनच असतं. एका चपलेची लहान गोष्ट सांगतो, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनातील आहे. एका भिल्लाने कर्मवीरांना बालपणी सांभाळलं होतं. अंगाखांद्यावर खेळवलं होतं. दिवसामागून दिवस निघून गेले. कर्मवीर आता मोठे झाले होते. तो भिल्ल क्रांतिवीर होता, देशासाठी लढत होता, त्याला इंग्रजांनी कैद केले. खटला चालला व त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. आदल्या दिवशी कर्मवीर त्याला भेटायला गेले, त्याने पाहिलं तो हसला. म्हणाला भाऊराया कसा आहेस तू? अरे उद्या मला फाशी होणार, कर्मवीरांचे डोळे भरुन आले. भिल्लच सांत्वन करत म्हणाला, अरे दु:ख मानायचं नाही, मला एक वस्तू देशील? तुझ्या पायात कोरी कोल्हापुरी चप्पल आहे ती मला दे.
कर्मवीरांनी गजाच्या फटीतून चप्पल आत सरकवली, त्याने पायात घातली. हसून म्हणाला, भाऊराया असा प्रेमाचा आधार असेल तर फाशीच्या वेदना संवेदना होतील. पुढे आयुष्यात भाऊराव पाटलांनी चप्पल वापरली नाही, लोक विचारायचे चप्पल कुठंय? भाऊराव पाटील म्हणायचे माझ्या दादाला दिली.
आवडली गोष्ट?