मोहनबुवा रामदासीभगवंताचे स्वरूप विशाल आहे, परंतु त्याची अनुभूती मात्र सुक्ष्माची घ्यायची आहे.नभासारीखे रूप या राघवाचे।मनी चिंतीता मूळ तुटे भवाचे।सृष्टीचे नियंत्रण, उत्पत्ती, स्थिती, लय साधण्याची एक मोठी जबाबदारी ईश्वराचीच असते. त्यामुळे विश्वरूप चैतन्याच्या साक्षीनेच या जगात सर्वकाही घडत असते. यात प्राणिमात्राच्या कल्याणाचा संकल्प ईश्वराने निश्चितच केलेला असतो. ज्या भगवंताचे स्वरूप विशाल आहे, त्याला समर्थ आकाशाची उपमा देतात; पण त्याच परमात्म्याचे खरं स्वरूप जाणण्यासाठी अत्यंत सूक्ष्म वृत्तीने ते अनुभवावे लागते. भगवंताचे अस्तित्व जाणून घ्यायचं असेल तर सृष्टीमध्ये घडणारी मोठ्यात मोठी आणि सुक्ष्मात सूक्ष्म घटना घडत असतात, त्याचा कर्ताकरविता परमेश्वरच असतो. परमेश्वर वेगळ्या पद्धतीने पाहणं अतिशय अवघडच असते. या घडणाऱ्या सर्व घटना केवळ ईश्वराच्या शक्तिसामर्थ्यावर घडत असतात. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी ईश्वरी शक्तीला मानवाने कधीही आव्हान देऊ नये. विशाल स्वरूप असणाºया भगवंताला पाहायचं असेल तर आपल्याला खूप सूक्ष्म व्हावं लागतं. याचा अर्थ अहंकारविरहित झाल्याशिवाय त्याचं दर्शन होत नाही अथवा होऊ शकत नाही. संकुचितपणा हा मानवी मनाचा केवळ स्वभाव असला, तरी तेच मन आकाशात उंच भरारी मारत असतं. तेच मन भगवंताला पाहण्यासाठी आतुर झालेलं असतं. भगवंताच्या शुद्ध कृपेचा खरा खरा आनंद घ्यायचा असेल तर समर्थ म्हणतात,मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे।जनी जाणता भक्त होवोनी राहे।म्हणून अशा विचारांचे खरे दर्शन म्हणजे ईश्वराची अनुभूती येणे. अविचाराने विकार वाढतात. विचाराने आत्मानंद प्राप्त होतो. ईश्वराची खरी अनुभूती हेच त्याचं खरं दर्शन असतं.
आनंद तरंग: ईश्वराची अनुभूती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 2:08 AM