सद्गुरू जग्गी वासुदेव
आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरूंच्या भौतिक सान्निध्यात असणे आवश्यक आहे का? एखाद्या व्यक्तीच्या सान्निध्यात असणे आवश्यक असते. कारण तुमचे आकलन अद्यापही तुम्ही जे ऐकता आणि जे पाहता यावर अवलंबून असते. एखादी व्यक्ती समोर बसलेली आहे हे आपण जोपर्यंत आपल्या डोळ््यांनी पहात नाही, तोपर्यंत आपले आकलन उघड होत नाही. गुरूच्या भौतिक सान्निध्यात राहण्यासाठी अनेक लोक पुरेशी परिपक्व नसतात. कारण तुम्ही जर गुरूंच्या सानिध्यात असलात, तर तुम्ही सतत मांडत असलेली त्यांच्याबद्दलची तुमची मते तुम्ही थांबवणार नाही. ते कसे खातात, कसे पितात, कसे बोलतात, लोकांमध्ये कसे मिसळतात, काय करतात, काय करत नाहीत याचे बारकाईने निरक्षण करत राहता. आणि असहायपणे यावरून तुम्ही त्यांच्याबद्दल अभिप्राय निर्माण करता. आणि त्यांच्याबद्दल जेवढे अधिक अभिप्राय निर्माण करता, तेवढे तुम्ही कमी ग्रहणशील बनता. हे सुद्धा एक कारण आहे बहुतेक गुरु आपल्या शिष्यांपासून जरा दूर राहण्याचे. मुख्य उद्देश बाजूलाच राहून अन्य ठिकाणी लक्ष भरकटू शकते. हे टाळण्यासाठीच ते दक्षता घेतात.
कधीतरी एखाद्या वेळेस ते उपस्थित होत असतात. पण इतरवेळी, ते फक्त त्यांचा निकटच्या दोन, तीन व्यक्तींसोबत वावरत असतात. त्यांना लोकांचा कंटाळा येतो म्हणून किंवा ते इतके महान आहेत की त्यांना सामान्य लोकांमध्ये मिसळणे जरा कमीपणाचे वाटते म्हणून नाही, तर हे त्यांचे एक प्रकारचे साधन होते. त्यांना माहित होते, जर लोकं सतत त्यांच्या अवतीभोवती खात, पीत, झोपत राहिली, तर लोक त्यांचे अलौकिक पैलू दुर्लक्षित करतील आणि फक्त त्यांच्या व्यक्तित्वातच अडकून पडतील. म्हणून, गुरूंच्या सान्निध्यात असणे हा एकप्रकारे आशीर्वाद असू शकतो पण तो एक मोठा अडथळा सुद्धा बनू शकतो, कारण मग तुम्ही असहायपणे त्यांच्याबद्दल अभिप्राय निर्माण करत रहाल आणि त्यांचे अलौकिक स्वरूप अनुभवण्यापासून वंचित होऊन बसाल.