- इंद्रजित देशमुखज्या व्यक्तीमध्ये निर्भयता आणि नम्रता ठायी ठायी अनुभवायला येते, त्याने पूर्णत्वाचा अधिकार प्राप्त केलेला असतो. निर्भयता यामुळे असते की, भयाची जी कारणे आहेत ती सर्व तकलादू आहेत. तत्कालीन आहेत. याला त्याने जाणलेले असते. अपयशाचे, अपमानाचेआणि मृत्यूचे भय याची मुळापासून जाणत्याला आलेली असते. विश्वाच्या पसाऱ्यामध्ये या सा-याला शून्य किंमत आहे. जिवाचे अस्तित्व आणि ऊर्जा या गोष्टींसाठी व्यर्थ घालवणे म्हणजे अनमोल आयुष्यातील उत्कट आनंदाचे क्षण वाया घालवणे, हे त्यालापटलेले असते. म्हणून तो प्रत्येक क्षण क्षुद्रतेमध्ये व्यतीत न करता, व्यापकतेत, समग्रतेत आणि उमदेपणाने व्यतीत करतो. प्रतिक्षण जगणे आणि सोडून देणे, हे त्याला अवगत झालेले असते. हे मूलभूत ज्ञान झाल्यानंतर त्याला काय गवसते, याबद्दल माउली म्हणतात, ‘ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे।जिथे शांतीचा अंकुर फुटे।।’ तो प्रशांतहोतो. त्याला अखंड विश्वाच्या विराटतेचा अनुभव आल्यामुळे स्वत:च्या अस्तित्वाचे खुजेपण आणि क्षणभंगुरपण समजलेलेअसते. म्हणून तो खूप विनम्र असतो. त्याचा शब्द, त्याचे चालणे, बोलणे, बसणे, उठणे यांमध्ये प्रचंड मृदुता आलेली असते. त्याच्या जगण्यातल्या कोमलतेत एक संगीताची लय आलेली असते. तो ज्या दिशेला जातो, ती दिशा स्नेहाने आणि प्रेमाने भारावून टाकतो. त्याच्या जगण्याचे प्रबंध आता फक्त उपकारासाठीच शिल्लक असतात. तो ज्या दिशेला जातो,ती दिशा उजळून जाते. त्याची पाऊले ही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. त्याचा सहवासहा दिव्यत्वाने भारलेला असतो. व्यापकता, नम्रता, निरागसता, निरामयता यांची प्रत्यक्ष प्रचिती त्याच्या सहवासात येते आणि अशा दिव्यत्वाच्या ठायी आपले हात आपोआप जुळतात.
आनंद तरंग : दिव्यत्वाची प्रचिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 3:01 AM