स्रेहलता देशमुख
आजच्या तंत्रयुगात निसर्गावर मात करून माणसाने विजय संपादन केला. मोठी धरणं बांधली; पण त्यांना तडे गेले. झाडं उन्मळून पडली. शेती उद्ध्वस्त झाली. हे वेगळेच; पण माणुसकीही विरली. हे मोठं दु:ख आहे. कारण या परिस्थितीतही चोऱ्या झाल्या. एखादे झाड तोडायचे, तर प्रथम त्याच्या फांद्या व नंतर बुंधा तोडतात. वाईट विचारांचेही तसेच आहे. फक्त फांद्या तोडून चालत नाहीत. ते मुळातून उपटून टाकायला लागतात. म्हणून सगुण भक्तीची योजना करावी लागते. ही भक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वत:ला विसरतो व मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतो. या भगवंताचा सहवास नामस्मरणाने लाभतो. एक मुलगा घरातून पळून गेल्यावर त्याची आई म्हणाली, ‘तो जिथे असेल तिथे सुखरूप असूदे व सुखाने राहूदे.’ तसेच आपण नामस्मरणाने घेतलेल्या नामाने सुखी होण्याचे ठरवूया.
ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान हे श्रेष्ठ आहे; पण विश्वास हवा. विं. दा. करंदीकर म्हणतात, ‘विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले. त्यावरी सीमा तयाला पाहिजे.’ भक्ती एकरूप होऊन, विश्वासाने केली म्हणजे ज्ञान उत्पन्न होते व ज्ञान, विज्ञानाची सांगड घालून शास्त्रज्ञ विचार करतात. शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांना प्रकाशकीय विज्ञान ध्वनिशास्त्रात रस होता म्हणूनच मृदुंग व तबला इतर ताल वाद्यांपेक्षा अधिक मधुर आवाज निर्माण करतात, हे त्यांनी शोधले. ते रंगीबेरंगी गोष्टींविषयी जाणून घेण्यात तत्पर असत. ते लेक्चरसाठी कोलकात्याला जहाजातून जाताना त्यांचे लक्ष समुद्राकडे गेले. निळं पाणी पाहिलं. नंतर त्यांनी आकाशाकडे पाहिलं. त्याचाही रंग निळाच होता. ते यामागचे शास्त्र शोधू लागले. पाण्याच्या अणूंवरून परावर्तित झालेला प्रकाश आकाशात पसरला म्हणून असे असावे. ते शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध करू लागले व ते झालेही म्हणून त्याला रामन इफेक्ट असे नाव दिले. त्यांना वाटायचे, शास्त्रीय समस्या सोडवण्यासाठी प्रयोगशाळेतच जायला हवे असे नाही. चिकाटी तसेच नाउमेद न होण्याची शक्ती हवी. नामाची शक्ती आजमावण्यासाठी चिकाटी व श्रद्धा असली तर समाजाचे कल्याण होईल.