कौरव पांडवांमध्ये जेव्हा द्यूत खेळले गेले तेव्हा धर्मराज युधिष्ठिर आपल्याकडील सर्व संपत्ती, वस्तू गमावून बसले. सर्वस्व हरलेल्या पांडवांना त्यानंतर बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास पत्करावा लागला. त्या काळात भगवान श्रीकृष्णांनी त्यांना वनवासात भेट घेऊन युधिष्ठिराला या संकटातून मुक्तता व्हावी म्हणून हे अनंतचतुर्दशीचे व्रत (Anant Chaturdashi 2024) करण्यास सांगितले. विशेष म्हणजे श्रीकृष्णाने त्याला या व्रताची एक कथा सांगितली. ती कथा अशी-
कृतयुगात सुमंतू नामक गुणी ब्राह्मण होता. त्याला एक मुलगी होती. तिचे नाव शीला. या मुलीच्या जन्मानंतर तिची आई मरण पावली. त्यामुळे सुमंतू ब्राह्मणाने पुन्हा लग्न केले. मात्र त्याची दुसरी पत्नी कजाग, भांडखोर होती. यथाकाल शीलाचे लग्न कौंडिण्यमुनीबरोबर झाले. लग्नानंतर ती सासरी जाण्यास निघाली त्यावेळी सुमंतूने पत्नीकडे शीलाला काही वस्तू आंदण म्हणून देण्याचा मनोदय व्यक्त केला. मात्र त्याच्या पत्नीने काहीही देण्यास नकार दिला. उलट मुलीचा आणि जावयाचा विनाकारण अपमान केला. अपमानित शीला दु:खी झाली. ती सासरी जाण्यास निघाली. वाटेत तिने नदीच्या किनारी काही स्त्रिया एकत्रितपणे पूजा करत असल्याचे पाहिले. ते अनंताचे व्रत होते. तिनेही लगेच पूजेत भाग घेऊन मनोभावे व्रत केले.
व्रतात सांगितल्याप्रमाणे तिनेही स्वत:च्या हातात अनंताचा दोरा बांधून घेतला. नंतर ती सासरी आली. त्या व्रताचे फळ म्हणून तिच्या संसारात समृद्धी आली, सर्व तऱ्हेची सुख, संपदा तिला प्राप्त झाली. कौंडिण्यमुनीला या अचानकपणे प्राप्त झालेल्या भरभराटीचा गर्व जाला. एकदा त्यांनी शीलाच्या हातातला अनंताचा दोरा विनाकारण काढून अग्नीत टाकला. परिणामी अनंताचा त्याच्यावर कोप झाला. अचानकपणे आलेली समृद्धी आल्या पावली वेगाने निघून गेली. पुन्हा दारिद्रयाचे दिवस सुरू झाले.
शीला समजूतदार होती. तिने पतीला त्याची चूक समजावून सांगितली. कौडिण्यमुनीला व्रताचे महत्त्व कळले. ते वनात गेले आणि त्यांनी अनंताचे व्रत करण्याचा निश्चय केला. अनंताचा शोध तो घेऊ लागला. परंतु त्याला अनंताचे दर्शन होईना. त्याने आयुष्य संपवून टाकायचे ठरवले. तेव्हा अनंताने अर्थात भगवान विष्णूंनी त्याला ब्राह्मणरूपात दर्शन दिले. अनंत चतुर्दशीचे व्रत करायला सांगितले. त्याने तसे केले. यथावकाश त्यांना गतवैभव प्राप्त झाले.
कौडिण्यमुनीला जसे गतवैभव प्राप्त झाले, तसे पांडवांना प्राप्त व्हावे म्हणून श्रीकृष्णाने युधिष्ठिराला वनवासात असताना हे व्रत अंगिकारायला सांगितले. पांडवांनी तसे केले. त्यानुसार या व्रताचे फल प्राप्त झाले.
Anant Chaturdashi 2024: अनंत चतुर्दशीला अनंताचा धागा बांधल्याने होतात अगणिक फायदे!
कथेचे सार काय, तर उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका! परिस्थिती बदलत राहते. दुसऱ्यांना कमी लेखू नका. देवकृपेने मिळालेल्या गोष्टींचा आदर करा. आपल्याकडे असलेल्या गोष्टींवर गर्व आणि नसलेल्या गोष्टींचे दुःखं करत न बसता अनंताला साक्ष ठेवून प्रामाणिकपणे आपले काम करत राहा! आपणही हीच प्रेरणा घेत अनंताला साक्ष ठेवून प्रामाणिक पणे आपले काम करावे, ही शिकवण या कथेतून मिळते!