Anant Chaturdashi Vrat 2024: मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व लाभलेला चातुर्मास काळ सुरू आहे. भाद्रपद महिन्याच्या पूर्वार्धाची सांगता होऊन आता उत्तरार्ध सुरू होत आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनंत चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्रीविष्णूंचे विशेष व्रत केले जाते. मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला 'अनंत चतुर्दशी'चे व्रत केले जाते. इतर व्रतांप्रमाणे हे व्रत सर्व मंडळी करत नाहीत. कारण हा एक वसा अहे. हे व्रत सलग १४ वर्षे करावे लागते. श्रीविष्णूंचे अनंताचे स्वरुप असणारे गोव्यात एक अतिशय देखणे मंदिर आहे.
गोव्याला जेवढा अथांग समुद्र लाभला आहे, तेवढीच प्राचीन संस्कृती, परंपराही लाभली आहे. गोव्यात अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत. ही मंदिरे केवळ संस्कृती, परंपरा यांसाठीच नाही, तर स्थापत्य कलेसाठीही जगप्रसिद्ध आहेत. पर्यटक गोव्यातील अनेक मंदिरांना आवर्जून भेटी देतात. देशात श्रीविष्णू आणि त्यांच्या अवतरांशी निगडीत शेकडो मंदिरे आहेत. परंतु, गोव्यातील सावई वेरे येथील अनंत मंदिर किंवा अनंताचे मंदिर आपले वैशिष्ट्य, वैविध्य जपून आहे. या मंदिराची एक कथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते.
४०० वर्षांपूर्वी श्री अनंताची पाषाणमूर्ती असल्याचा दृष्टांत
४५० वर्षे पोर्तुगीज राजवट गोव्यामध्ये होती. असे असूनही गोव्याची संस्कृती आजही अबाधित आहे. येथील प्राचीन देवालये आणि त्यांचा इतिहास नेहमीच अचंबित करणारा असतो. असेच एक प्राचीन मंदिर फोंडा तालुक्यात आहे. राज्यातील एकमेव असे श्री अनंत देवस्थान फोंडा तालुक्यातील सावई-वेरे गावात आहे. विशेष म्हणजे या मंदिरात असलेली श्री अनंताची पाषाणमूर्ती ४०० वर्षांपूर्वी सापडली. जवळपास ४०० वर्षांपूर्वी सावई-वेरे येथील नदीकाठी श्री अनंताची पाषाणमूर्ती असल्याचा दृष्टांत तेथील एका गृहस्थाला झाला. सुरुवातीला दुर्लक्ष केले. परंतु, सतत होत असलेल्या दृष्टांतामुळे या गृहस्थाने शोध घेण्याचे ठरविले.
शेषनागावर शयनावस्थेत असलेली श्री अनंताची मूर्ती सापडली
त्या गृहस्थाने खूप शोधाशोध केल्यावर नदीच्या पलीकडे त्यांना एकमात्र होडी दिसली. सुर्ल गावातील एका मुस्लिम व्यापाऱ्याची ती होडी होती. गावकऱ्यांसोबत ते गृहस्थ नदी ओलांडून त्या मुस्लिम बांधावाच्या घरी आले. त्यांनी त्याला श्री अनंताची पाषाणमूर्ती देण्याची विनंती केली. परंतु, आपण मुस्लिम असून मूर्तिपूजा करीत नाही, तेव्हा आपल्याकडे मूर्ती नाही. पण खात्री करून घेण्यासाठी तुम्ही होडीमध्ये जाऊन पाहू शकता असे सांगितले. गावकऱ्यांनी होडीमध्ये शोध घेतला. हाती काहीच लागले नाही. शेवटी होडीतून उतरताना एका व्यक्तीची नजर कोपऱ्यात उभ्या असलेल्या पाषणावर पडली. मुस्लिम व्यापऱ्याने ते पाषाण होडीचा तोल सावरण्यासाठी ठेवले होते. पाषाण उलटून पाहिले तेव्हा त्यावर शेषनागावर शयनावस्थेत असलेली श्री अनंताची मूर्ती सापडली.
हे मंदिर चहोबाजूंनी पाण्यात आहे
गावकऱ्यांनी मंदिर होईपर्यंत गावातील कुळागारात एका खड्डयात पाणी घालून ती मूर्ती ठेवण्यात आली. मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर विधिवत त्या पाषाणमूर्तीची स्थापना केली गेली. हे मंदिर चहोबाजूंनी पाण्यात आहे. त्याच्या एकाबाजूला तळी असून मंदिराच्या खांबावर छान कोरीव काम केले गेलेले आहे. तेथील एक घंटेवर ई.स. १७९१ मध्ये जे. वॉर्नर अँड सन्स असे लिहिलेले आढळून येते. सभागृहातील प्रत्येक खांबावर पौराणिक काळातील गोष्टींचे कोरीव काम केले आहे. तिथे असलेल्या सहा खांबांपैकी एकाला चांदीचे वलय दिलेले आहे. कालांतराने मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली असली तरी मंदिरात उभ्या असलेल्या कोरीव लाकडी खांबावरून ही वास्तु किती पुरातन आहे, ते दिसून येते.