Anant Chaturdashi Ganpati Visarjan 2024: गणेशोत्सवाची आता सांगता होत आहे. १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी आहे. मंडळांसह हजारो घरगुती गणपतीचे विसर्जन या दिवशी होईल. भाविकांचा, भक्तांचा यथोचित पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा आपल्या गावी परत जाईल. बाप्पाला निरोप देताना अनेकांना भावना अनावर होतात. साश्रू नयनांनी गणरायाला निरोप दिला जातो. परंतु, यंदा अनंत चतुर्दशी मंगळवारी आल्याने या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करावे की नाही, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. शास्त्र काय सांगते? जाणून घेऊया...
प्राचीन मान्यतांनुसार, मंगळवार हा गणपती बाप्पाला समर्पित असल्याचे मानले जाते. या दिवशी गणरायाची विशेष पूजा केली जाते. मंगळवारी गणपतीचे नामस्मरण, मंत्रांचा जप, उपासना, सेवा केल्याने पुण्य फलाची प्राप्ती होते, असे सांगितले जाते. दर मंगळवारी न चुकता, नित्यनेमाने गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातच यंदा अनंत चतुर्दशी मंगळवारी आली आहे. त्यामुळे आता मंगळवारी लाडक्या बाप्पाचे विसर्जन कसे करावे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मंगळवारी गणपती बाप्पाचे विसर्जन करावे की नाही?
मंगळवारी गणपती बाप्पाचे विसर्जन करावे की नाही? असे करणे योग्य की अयोग्य? असे संभ्रम समाजात असल्याची चर्चा आहे. मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन न करता दुसऱ्या दिवशी करावे का, असाही प्रश्न अनेकांच्या मनात आले आहे. परंतु, वास्तविक पाहिले तर मंगळवार आणि गणपती विसर्जन याचा तसा काही संबंध नाही. यापूर्वी, २०१७ आणि २०२० मध्ये मंगळवारी अनंत चतुर्दशी आली होती. त्यामुळे यंदाही आपापले कुळाचार, कुळधर्म, प्रथा, परंपरा, रिती यांनुसार १७ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन केव्हाही करू शकता, असे सांगितले जात आहे.
अनंत चतुर्दशी: ‘अशी’ करा गणपतीची उत्तरपूजा; पाहा, विसर्जन विधी, मंत्र अन् प्रार्थना
अनंत चतुर्दशी सकाळी संपते मग त्याआधी विसर्जन करावे का?
यंदा, सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०३ वाजून १० मिनिटांनी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी सुरू होत आहे. तर, मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी चतुर्दशी संपत आहे. अनंत चतुर्दशी सकाळी ११.४४ मिनिटांनी संपत असल्यामुळे त्यापूर्वीच विसर्जन करावे का, असा प्रश्नही अनेकांच्या मनात आलेला आहे. परंतु, तसे काही नाही. भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने चतुर्दशी तिथी मंगळवारी संपत आहे. त्यामुळे १७ सप्टेंबर २०२४ रोजी दिवसभरात केव्हाही गणपती विसर्जन करू शकता, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, घरामध्ये गर्भवती महिला असेल, तर बाळ होईपर्यंत गणपती मूर्ती तशीच ठेवावी का, असाही प्रश्न विचारला जातो. परंतु, या प्रथेला कोणताही शास्त्राधार नाही. त्यामुळे आपण आपल्या परंपरा, कुळाचार, कुळधर्म यानुसार मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती विसर्जन करू शकता, असे म्हटले जात आहे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.