संकष्ट चतुर्थीचे व्रत आपण करतोच, पण मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे अर्थात अंगारकीचे व्रत केल्याने होणारा लाभ जाणून घेऊया! येत्या मंगळवारी म्हणजेच २५ जून रोजी अंगारक संकष्ट चतुर्थीचा योग जुळून आला आहे, त्यानिमित्ताने जाणून घेऊया या व्रतामागची कथा!
साम नावाचा एक दुष्ट असुर होता. तो वाटमारी करून वर शिवाय त्या लोकांना ठार मारीत असे. एकदा तो वाटमारी करण्यासाठी झाडावर दबा धरून बसला होता. पण त्या दिवशी त्याला वाटमारीसाठी कुणीच भेटले नाही. त्यामुळे त्याला उपास घडला. रात्री चंद्रोदय झाल्यावर तो घरी आला. त्याने आपला मुलगा गणेश याला हाक मारली. परंतु गणेशाला ती हाक ऐकू आली नाही. म्हणून तो दारापाशी थांबून अविरत गणेश, गणेश, गणेश अशा हाका मारू लागला. खूप वेळाने त्याची हाक गणेशाच्या कानावर पडली व त्याने दार उघडले. सामाच्या बायकोने स्वयंपाक करून ठेवला होता. मग त्यांनी एकत्र भोजन केले.
या दिवशी गणपतीची आवडती चतुर्थी तिथी होती. सामाकडून त्या दिवशी नकळत गणेशाचा जप घडला आणि कामाच्या शोधात दिवसभर उपास घडला. चंद्रोदयानंतर भोजन झाले. याचा एकत्रित परिणाम असा झाला, की सामाच्या ठायी पुण्याचा संचय झाला आणि मृत्यूनंतर त्याला स्वर्गप्राप्ती झाली.
परंतु संपूर्ण आयुष्यात आपल्या हातून वाटमारी करताना अनेकांची हत्या झाली, याचे दु:खं त्याला स्वर्गात गेल्यावर होऊ लागले. ते पापक्षालन व्हावे अशी त्याची इच्छा होती. म्हणून देवांनी त्याला पुन्हा मानव जन्मात घातले. कृतवीर्य नावाने तो पृथ्वीवर परत आला. त्याचा विवाह झाला. पण पुत्रप्राप्ती नव्हती. त्यामुळे त्याच्या मनाला शांतता नव्हती. चतुर्थी व्रताने मनोकामना पूर्ण होतात, हे तो जाणून होता. म्हणून तो मनोभावे गणपतीची आराधना करू लागला. त्याला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे कुटुंब-घरदार सुखी झाले. ही हकीकत अन्य गणपती भक्तांना कळले आणि तेव्हापासून तेदेखील संकष्ट चतुर्थीचे व्रत करू लागले.
कृतवीर्याप्रमाणे आपल्याही मनोकामना पूर्ण होवोत आणि आपल्यालाही सद्गती प्राप्त होवो, यासाठी आपणही संकष्ट चतुर्थीचे व्रत अंगिकारूया.