हिंदू धर्मात पाच मुख्य देवतांमध्ये पहिले स्थान सूर्यदेवाला मिळाले आहे. कारण सूर्यदेव एकमेव असे आहेत, ज्यांना धरतीवरून प्रत्यक्ष पाहता येते. जीवसृष्टीसाठी सूर्यदेवाचे अतिशय महत्त्व आहे. वेदांमध्ये सूर्यदेवाला सृष्टीचा आत्मा म्हटले आहे. सूर्यप्रकाशामुळे सृष्टीचे चक्र सुरळीत फिरत आहे. सूर्यदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शास्त्राने रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे असे सांगितले आहे.
सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मकता वाढते, तसेच हातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळते. सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले आहे. जर तुमच्या कुंडलीत रवि प्रबळ असेल, तर तुमचे भाग्य तुम्हाला राजपथापर्यंत नेते. अशा व्यक्ती ज्या क्षेत्रात जातात त्याच्या शिखरापर्यंत पोहोतचात. अशा लोकांना सरकारी नोकरी मिळण्यातही अडचणी येत नाहीत. तुमच्या कुंडलीतील ग्रहदशा बदलून रविस्थान प्रबळ झाले, तर अन्य पापग्रहांचा त्रास तुम्हाला होऊ शकत नाही.
सूर्यदेवाला प्रसन्न करून घेण्याचा उत्तम पर्याय आहे, सूर्याला अर्घ्य देणे. रविवार सूर्यदेवाला समर्पित आहे. अन्य दिवशी जमले नाही, तरी या दिवशी सूर्याला अवश्य अर्घ्य द्यावे. जी व्यक्ती सूर्यदेवांना अर्घ्य घेऊन दिवसाची सुरुवात करते, तिच्या वाट्याला अपयश येत नाही. सूर्याला अर्घ्य देण्याचे शास्त्रात अनेक फायदे सांगितले आहेत.
- सूर्याला अर्घ्य दिल्याने नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतील. तसेच नोकरीत बढती मिळत राहील.
- जी व्यक्ती सूर्याला अर्घ्य देते, तिला सूर्यासारखे तेज प्राप्त होते. त्यामुळे व्यक्तीमत्त्व आकर्षक बनते व लोकप्रियता वाढते.
- पुराणातील उल्लेखानुसार भगवान महाविष्णू यांनी राम अवतारात जन्म घेतला, तेव्हा ते रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देत असत. याचेच फलित असे, की बलाढ्य शक्तीचा रावण श्रीरामांच्या केसालाही धक्का लावू शकला नाही.
- तुम्हालाही तुमच्या कार्यक्षेत्रात शिखर गाठायचे असेल, तर पुराणात सांगितलेला उपाय अवश्य करा.
- सर्वप्रथम सूर्योदयापूर्वी उठा. सूर्यदेवाला एका निरांजनात तेल आणि वात लावून दिवा दाखवा. त्यानंतर एका तांब्याच्या कलशात पाणी घेऊन पूर्व दिशेला तोंड करून 'ओम सूर्याय नम:' या मंत्राचा तीनदा उच्चार करा. अर्घ्य देऊन झाल्यावर जमिनीवर डोके ठेवून सूर्यदेवांना नमस्कार करा.
- यावेळी एक खास उपाय करा, जेणेकरून तुमचा अकाली मृत्य टळेल. आजारातून सुटका होईल. दीर्घायुष्य प्राप्त होईल. तो उपाय म्हणजे-
- तांब्याच्या कलशात यमुनेच्या पाण्याचे दोन चार थेंब टाका. यमुना ही सूर्यदेवांची मुलगी आणि यमराजाची बहीण आहे. अर्घ्य देताना यमुनेच्या पाण्याचे थेम्ब टाकल्याने या दोन्ही देवता शीघ्र प्रसन्न होतात.
- तुम्ही जेव्हा केव्हा यमुनेचे दर्शन घ्याल, तेव्हा आठवणीने एका बाटलीतून यमुनेचे पाणी घरी घेऊन या. जेव्हा जेव्हा सूर्यदेवाला अर्घ्य द्याल, तेव्हा या पाण्याचे थेंब अवश्य टाका.
- हा उपाय केल्याने तुमच्या बरोबरच तुमच्या कुटुंबालाही अकाली मृत्यू येणार नाही आणि हर तऱ्हेच्या आजारातून सूर्यदेव तुमची सुटका करतील असा विश्वास धर्मशास्त्राने दिला आहे!