५ एप्रिल २०२२ रोजी अंगारक विनायक चतुर्थी आहे. ज्याप्रमाणे संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली असता अंगारकी म्हणून तिचे महत्त्व वाढते, तसे विनायकी देखील मंगळवारी आली असता ती अंगारक विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
प्रत्येक मासाच्या शुक्ल चतुर्थीला `विनायक चतुर्थी' असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी ही माध्यान्हव्यापिनी असावी लागते. अर्थात त्यात सूर्यदर्शनाला महत्त्व असते. तर ज्या कृष्ण चतुर्थीला 'संकष्ट चतुर्थी' म्हणतात, त्या चतुर्थीचा काळ असताना चंद्रोदय व्हावा लागतो, म्हणजे ती चंद्रोदयव्यापिनी असावी लागते. त्यात चंद्रदर्शनाला महत्त्व असते. हा दोन्ही चतुर्थींमधला मुख्य फरक आहे.
प्रत्येक मासाच्या शक्ल आणि कृष्ण चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे. मासातून दोन चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमुद आहेत. परंतु, त्यांचा अधिक तपशील मिळत नाहीत. माघ शुक्ल चतुर्थीला कश्यपमुनी आणि अदिती या दांपत्याच्या पोटी गणपतीने `महोत्कट विनायक' नावाने जन्म घेतला आणि राक्षसांचे पारिपत्य केले. तर कृष्णपक्षात संकष्टीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांच्या पोटी गणेशाने जन्म घेतला, ती भाद्रपद चतुर्थी! पुढे देवांचा सेनापती म्हणून गणेशाने काम केले. म्हणून या दोन्ही चतुर्थींना गणेशव्रत केले जाते.
संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपास सोडतो, परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे. उपास शक्य नसेल, तर गणेशाची मनोभावे पूजा अर्चा करून 'ओम सिद्धिविनायकाय नम:' या मंत्राचा जप करून व्रतपूर्ती करावी.
त्याचप्रमाणे अथर्वशीर्ष म्हणून गणेशाची पूजा करावी. अथर्व म्हणजे ज्याचे मस्तक हलत नाही, शांत असते, संकटकाळातही स्थिर असते, अशा गजाननाचे स्तोत्र. हे स्तोत्र मनोभावे पठण केले असता, तसेच या स्तोत्राची स्पष्ट उच्चारासह एकवीस किंवा सहस्र आवर्तने केली असता, वाचासिद्धी येते असा भाविकांचा अनुभव आहे.
आजच्या तणावात्मक वातावरणात, ही व्रत आणि त्यांचे उपचार मन:शांती देतात. स्तोत्रांची ताकद सकारात्मक वलय निर्माण करते. उपासामुळे आरोग्यशुद्धी होते. जपजाप्यामुळे मन एकाग्र होते. पूजेमुळे वातावरण प्रफुल्लित होते. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम आपल्या तनामनावर होतो. म्हणून अशा व्रतांचे पालन स्वान्तसुखासाठी तरी अवश्य करावे.