Ram Mandir Ayodhya Ramlala Darshan And Aarti Timings 2025: सन २०२४ च्या जानेवारी महिन्यात अयोध्येत भव्य राम मंदिराचे लोकार्पण करून रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याची जगभर चर्चा झाली. अयोध्येत येऊन राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. आतापर्यंत कोट्यवधी रामभक्तांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. केवळ भारतातून नाही, तर जगाच्या अनेक देशांतून भाविका, पर्यटक भव्य राम मंदिर पाहण्यासाठी अयोध्येत पोहोचले. भाविकांनी दिलेल्या दानाचे प्रमाणही प्रचंड असल्याचे सांगितले जात आहे.
सन २०२५ मध्ये राम मंदिराच्या भव्य सोहळ्याला एक वर्ष पूर्ण होणार आहे. ११ जानेवारी २०२५ रोजी नव्या भव्य राम मंदिराची वर्षपूर्ती असणार आहे. या निमित्ताने लाखो भाविक अयोध्येत राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेण्यासाठी तयारी करत आहेत. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि राम मंदिर प्रशासनही या तयारीला लागल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण राम मंदिर परिसर लवकरच पूर्ण केला जाणार आहे. राम मंदिर, हनुमानगढी, लता चौक, गुप्तर घाट, सुरजकुंड आणि इतर लोकप्रिय ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.
सन २०२५ मध्ये भाविकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता
सन २०२५ मध्ये राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेण्याची इच्छा असणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन वर्ष २०२५ च्या पहिल्या दिवसापासून अयोध्येत भाविकांचा जनसागर मोठ्या प्रमाणात येऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे. यासाठी दर्शनाची वेळ वाढवण्यात आली आहे. सर्व भाविकांना दर्शनाचा सुलभ, सुरळीत अनुभव मिळावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रीराम मंत्राचा सहा लाख वेळा जप केला जाणार
११ जानेवारी २०२५ रोजी नव्या भव्य राम मंदिराच्या वर्षपूर्ती निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांसाठी पाच ठिकाणी स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. यज्ञ मंडपात १९७५ मंत्रांसह अग्नि देवतेला आहुती दिली जाणार आहे. श्रीराम मंत्राचा सहा लाख वेळा जप केला जाणार आहे. प्रार्थना मंडपात परमेश्वराला राग सेवा अर्पण केली जाईल. मंदिराच्या प्रांगणात तीनही दिवस रामललासमोर अभिवादन गीते गायली जातील. प्रवासी सुविधा केंद्रात संगीतमय मानस पाठ होईल. अंगद टिळा येथे रामकथा, दिवसभर प्रवचन व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
घरबसल्या ऑनलाइन बुकिंग करता येणार
भाविकांची सोय, सुविधा लक्षात घेऊन आता घरी बसूनच ऑनलाइन पद्धतीने दर्शन बुकिंग करता येणार आहे. नवीन वर्षात अयोध्येला भेट देण्याची योजना असलेले भाविक श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे स्लॉट बुक करू शकतात, अशी माहिती देण्यात आली आहे. ट्रस्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन, भाविक आपले तपशील प्रविष्ट करून इच्छित स्लॉटची निवड करू शकतात. ऑनलाइन बुकिंगसाठी सर्व अटी व शर्तींची माहिती ट्रस्टच्या पोर्टलवर तपशीलवार उपलब्ध करून देण्यात आहे. हे पोर्टल केवळ दर्शन आणि आरतीच्या वेळेची माहिती देत नाही, तर या ठिकाणी कसे पोहोचायचे याची माहिती देते.
अयोध्या राम मंदिर दर्शनाची वेळ
- सकाळी ७ ते ९- सकाळी ९ ते ११- सकाळी ११ ते दुपारी १२- दुपारी १.३० ते ३- दुपारी ३ ते ५- सायंकाळी ५ ते ७- सायंकाळी ७ ते ९
राम मंदिर रामलला आरती वेळ
- मंगल आरती: पहाटे ४:३०- श्रृंगार आरती: सकाळी ६.३०- शयन आरती: रात्री ९.३०