भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये गणपतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. कोट्यवधी घरात गणपती बाप्पाची न चुकता दररोज आवर्जून पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये गणपतीला आराध्य मानून सेवाभावाने पूजन, नामस्मरण, आराधना, व्रत-वैकल्ये केली जातात. गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते. त्यामुळे आपल्यावर येणारी संकटे, समस्या, अडचणी गणेशकृपेने दूर होऊ शकतात, अशी मान्यता आहे. घरावरील संकटे, समस्या दूर होत नसतील तर काही वास्तुदोष आहे का हे पाहिले जाते. वास्तुशास्त्रानुसार, त्याचे निराकरण केले जाते. वास्तुशास्त्रात तसे काही उपायही सांगितले जातात. परंतु, घराच्या प्रवेश द्वारावर गणपती असावा की नसावा, याबाबत काही मतमतांतरे असल्याचे पाहायला मिळते.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजावर गणेशाची मूर्ती, शुभ लाभ लिहिल्याने आणि स्वस्तिक काढल्याने शुभफळ प्राप्त होते. घराचा मुख्य दरवाजा महत्त्वाचा असतो. घरातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा दरवाजातून आत येतात. गणपतीची शेंदूर चर्चित गणेश मूर्ती घराच्या प्रवेश द्वाराशी ठेवल्याने सकारात्मक लहरी अधिक वेगाने आकर्षित होतात आणि नकारात्मक लहरी दूर जातात. घराच्या प्रवेश द्वारावर मूर्ती ठेवण्यास जागा नसेल तरी हरकत नाही. त्याला पर्याय म्हणून गणेशाची प्रतिमा चिकटवावी. गणेश दर्शन होणे महत्त्वाचे असते. गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमेप्रमाणे स्वस्तिक, ओम, श्री गणेश ही चिन्हेदेखील गणेशाचे अस्तित्व दर्शवतात. म्हणून गृह्प्रवेशाच्या वेळीसुद्धा दारावर स्वस्तिक रेखाटले जाते किंवा शुभ-लाभ, ओम, श्री गणेशाय नमः लिहून गृहप्रवेश केला जातो, असा एक मतप्रवाह आहे.
घराच्या प्रवेश द्वारावर गणपती असावा की नसावा?
काहींच्या मताप्रमाणे, अनेक घरांच्या प्रवेशद्वारावर गणपती पाहायला मिळतो. एखादी मूर्ती, फोटो, टाइल्सवर कोरलेली प्रतिमा अशा अनेक स्वरुपात घराच्या प्रवेश द्वारी गणपती पाहायला मिळतो. गणपतीला द्वारपाल स्वरुपात प्रवेश द्वारावर स्थानापन्न केले जाते. पुराणातील प्रसिद्ध कथेनुसार, गणपती द्वारपाल झाला, तेव्हा काय काय घडले, हे सर्वांना माहिती आहे. गणपतीला कधीही द्वारपाल करू नये. याचे काही प्रतिकूल परिणाम दिसू शकतात, असे म्हटले जाते. गणपती द्वारपाल स्वरुपात असेल, तर घरात क्लेष होतात, वडील-मुलगा किंवा वडील-कन्या यांच्यातील संघर्ष वाढू शकतो. कोणत्या ना कोणत्या स्वरुपात पालक आणि मुलांमधील संबंधावर परिणाम होऊ शकतो. नातेसंबंध बिघडू शकतात. जेव्हा गणपती द्वारपाल झाला, तेव्हा युद्ध झाले. घरात गणपती आराध्य म्हणून पूजला जात असताना, द्वारपाल स्वरुपात ठेऊ नये. अशी चूक कधीही करू नये, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.