यंदा १९ जून पासून आषाढ मास सुरु आहे. आपल्या संवत्सर चक्रातील चौथा महिना आषाढ होय. जेव्हा पूर्वाषाढा अथवा उत्तराषाढा नक्षत्र पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर असते, त्या मासाला आषाढ असे नाव आहे. याच आषाढाचे दुसरे नाव 'शुचि' असे आहे. या मासाचे विस्तृत वर्णन ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी धर्मबोध ग्रंथात केले आहे.
नेमका या काळातच पाऊस होतो, म्हणून कवीदेखील `ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना' असे आर्जव करू लागतात. तसेच `गडद निळे गडद निळे जलद भरून आले' अशी त्याच्या आगमनाची आनंदवार्ता साऱ्यांना सांगू लागतात. महाकवी कालिदासालाही या मेघदूतांनी मंत्रमुग्ध केले. 'आषाढस्य प्रथम दिवसे' अशा शब्दात आपल्या `मेघदूत' या अजरामर रचनेचा प्रारंभ करून कविराजांनी आषाढाबद्दलची आपली आत्मीयता व्यक्त केली आहे. कालिदासाच्या जन्माची तिथी निश्चितपणे नमूद नसल्याने आषाढाच्या पहिल्या दिवसाला 'महाकवी कालिदास दिन' म्हणून संबोधले गेले.
हा महिना अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. पांडुरंगाच्या भक्तीचा महापूर या मासातील शुद्ध एकादशीस म्हणजे आषाढी एकादशीस येतो. त्यानंतर चारच दिवसांनी येणारी गुरुपौर्णिमा ही `ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था' असा जयजयकार करणारी आहे. अशातच यावेळी अधिक श्रावण मास आहे. मंगळवार, १८ जुलै पासून अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. यंदा श्रावण महिना अधिक आहे. बुधवार, १६ ऑगस्ट रोजी संपेल.
आषाढ महिन्यात सूर्याचे कर्कसंक्रमण होते, तिथूनच दक्षिणायन सुरू होते. हिंदूंच्या दृष्टीने महत्त्वाचा असा चातुर्मास आषाढ शुद्ध एकादशीपासून सुरू होतो. काही मंडळी आषाढ पौर्णिमेपासून चातुर्मास प्रारंभ मानतात. आषाढ शुद्ध एकादशीपासून पुढे चार महिने देव झोपी जातात, अशी श्रद्धा आहे. देवांच्या या शयनकाळात असूर प्रकट होऊन मानवाला त्रास देऊउ लागतात. असुरांच्या या त्रासापासून स्वत:चे रक्षण करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने त्याला शक्य होईल असे कोणते ना कोणते व्रत करावे. म्हणून चातुर्मासात विपुल व्रत-वैकल्ये आचरली जातात. काही मंडळी रोज एक वेळ भोजन करतात, तर काही जण एक दिवस उपवास आणि दुसऱ्या दिवशी भोजन असे `धारणा-पारणा' नावाचे व्रत करतात. काहीजण चार महिने केवळ एक अथवा दोनच धान्यांचा आहारात समावेश करतात.
या चातुर्मासात एक चातुर्मास्य व्रत आहे. त्यात श्रावण मासामध्ये भाजीपाला, भाद्रपद मासात दही, अश्विन मासात दूध तर कार्तिक मासात द्विदल धान्य पूर्णत: व्यर्ज्य करावयाची असतात. या व्रताची सुरुवात आषाढ शुद्ध द्वादशीला विष्णूपूजा करून केली जाते. या पूजेत जाईच्या फुलांना विशेष महत्त्व असते. तर कार्तिक पौर्णिमेला या व्रताचे उद्यापन करतात. त्यानंतरच सर्व सेव्य पदार्थांचा आहारात पुन्हा वापर केला जातो.
आषाढाचा पहिला पंधरवडा असा पवित्रपूर्ण असला, तरी ही सगळी पतिव्रता अमावस्येच्या दिवशी कुठे जाते कुणास ठाऊक? कारण, गटारी अमावस्या सर्वसामान्य माणसाला एकापरीने अध:पतित करते असेच म्हटले पाहिजे. दारु पिणाऱ्या लोकांना काहीतरी कारण हवे असते. लोकांना गटारी अमावस्या हे दारु पिण्यासाठी भक्कम निमित्त वाटते. मुळात ह्या अमावस्येला हे विकृत स्वरूप मिळाले, हे दुसऱ्या दिवसानंतर म्हणजे आषाढ अमावस्येनंतर येणाऱ्या श्रावणात पूर्ण मासभर उपवास असल्यामुळे दारु पिता येणार नाही, अशी लोकांनी सोय (?) करून ठेवली. स्वत:च्या मनातील इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी धर्मातील काही मार्गांचा कसा कौशल्याने दुरुपयोग केला जातो, त्याचे गटारी अमावस्या हे लाजिरवाणे, क्लेशकारक उदाहरण आहे. परंतु, संस्कृतीने आषाढ अमावस्येला दिलेले रूप किती सुंदर आहे, ते आगामी लेखात जाणून घेऊच. तुर्तास आषाढाचे हर्षोल्हासाने स्वागत करू...!