Ashadh June Gupt Navratri 2023: मराठी नववर्षात चार नवरात्र साजरी केली जातात. यापैकी दोन नवरात्रोत्सव प्रकटपणे साजरे केले जातात. तर दोन नवरात्र गुप्तपणे साजरे केले जातात. यंदाच्या मराठी नववर्षातील पहिले गुप्त नवरात्र आषाढ महिन्यात साजरे केले जात आहेत. चैत्र नवरात्र झाल्यानंतर आता आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्र साजरे होत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या गुप्त नवरात्रीला अद्भूत योग जुळून आल्याचे सांगितले जात आहे. गुप्त नवरात्राच्या महत्त्वाच्या तारखा, मुहूर्त आणि काही मान्यता जाणून घेऊया... (Ashadh June Gupt Navratri 2023 Important Dates)
आषाढ महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात शुद्ध पक्षातील प्रतिपदा तिथीपासून आषाढ गुप्त नवरात्र सुरू होते. यंदा आषाढ गुप्त नवरात्री १९ जूनपासून सुरू होत आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीला खूप महत्त्व आहे. गुप्त नवरात्र फारसे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जात नाही. कारण गुप्त नवरात्र हे तंत्र-मंत्र सिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. साधना आणि तंत्रमंत्र साधक या नवरात्र काळात विशेष साधना करतात, असे म्हटले जाते. (Ashadh June Gupt Navratri 2023 Significance)
आषाढ गुप्त नवरात्रीला अद्भूत शुभ योग
आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीला आर्द्रा नक्षत्र म्हणजेच राहुचे नक्षत्र सुरू होत आहे. राहुकाल आणि राहुच्या नक्षत्रात देवीची उपासना आणि तंत्र मंत्र सिद्धी केल्यास अधिक फलदायी आणि लाभदायक असते, असे तंत्रशास्त्र आणि धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. योगायोग म्हणजे वृद्धी योगात आषाढ गुप्त नवरात्रीची सुरुवात होत आहे. अशा प्रकारे गुप्त नवरात्रीला देवीच्या दहा महाविद्यांची उपासना करणार्यांना भक्तिरिद्धी सिद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे. (Ashadh June Gupt Navratri 2023 Rare Shubha Yoga)
गुप्त नवरात्रीत देवीच्या दहा महाविद्यांच्या साधनेचे महत्त्व
प्रकट नवरात्रोत्सवात देवीच्या दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तर गुप्त नवरात्रीला देवीच्या दहा महाविद्यांची पूजा, साधना, उपासना केली जाते. देवीच्या या दहा महाविद्या अतिशय शक्तिशाली आहेत. ज्या भक्तावर देवीची कृपा होते, त्याला जगात कोणतीही गोष्ट दुर्मिळ राहत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देवीच्या या दहा महाविद्या आहेत- काली, तारा (देवी), चिन्नमस्ता, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरा भैरवी (त्रिपुर सुंदरी), धुमावती, बगलामुखी, मातंगी, कमला. गुप्त नवरात्रीमध्ये, भक्त तंत्र मंत्राच्या प्राप्तीसाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी दहा महाविद्यांची पूजा करतात.
आषाढ गुप्त नवरात्रीच्या महत्त्वाचा तारखा
आषाढ गुप्त नवरात्र १९ जूनपासून सुरू होऊन २७ जून रोजी याची सांगता होईल. आषाढ गुप्त नवरात्र पूर्ण ९ दिवसांचे असणार आहे. २५ जून रोजी सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. संपूर्ण गुप्त नवरात्रीमध्ये ४ रवियोग जुळून येत आहे. असा योग अत्यंत दुर्मिळ मानला जातो. या नवरात्रीमध्ये २० जून, २२ जून, २४ आणि २७ जून रोजी रवियोग आहे.