Ashadha Gupt Navratri 2024: मराठी वर्षभरात चार नवरात्रीत व्रताचरण करण्याची परंपरा आहे. या चार पैकी दोन नवरात्री प्रकटपणे साजऱ्या केल्या जातात. तर दोन नवरात्रीत गुप्तपणे व्रताचरण केले जाते. या नवरात्रांमध्ये देवीच्या विविध स्वरुपांची उपासना, नामस्मरण, विशेष पूजन केले जाते. गुप्त नवरात्रीला महत्त्व का आहे, गुप्त नवरात्रीचे व्रताचरण कोणत्या संकल्पांसाठी करतात, या मराठी वर्षातील पहिली गुप्त नवरात्री कधीपासून सुरू होत आहे? जाणून घेऊया...
नवरात्री म्हणजे देवी दुर्गा, भगवतीच्या नऊ रूपांची, नऊ शक्तींची आराधना करण्याचे दिवस. मराठी वर्षातील पहिले नवरात्र चैत्र महिन्यात साजरे करण्यात आले. याला चैत्र नवरात्र म्हटले जाते. हे नवरात्र प्रकटपणे साजरे केले गेले. यानंतर आता मराठी वर्षातील पहिले गुप्त नवरात्र आषाढ महिन्यात आहे. गुप्त नवरात्रीत एखाद्या विशेष मनोकामनांची पूर्तीसाठी, तंत्र साधना करण्यासाठी व्रताचरण केले जाते. गुप्त नवरात्रीत तप, साधना केल्यास दुर्मिळ सिद्धी प्राप्त होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
कधीपासून सुरू होणार गुप्त नवरात्री?
०६ जुलै २०२४ रोजी आषाढ महिना सुरू होत आहे. या आषाढ महिन्याच्या प्रतिपदेपासून ते आषाढ नवमीपर्यंत गुप्त नवरात्री आहे. म्हणजेच ०६ जुलै ते १५ जुलै या कालावधीत गुप्त नवरात्री साजरी केली जाणार आहे. गुप्त नवरात्रीचे ९ दिवस विशेष मंत्रांचा जप, नामस्मरण, साधना केल्याने व्यक्तीला देवी दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो. जीवनात सुख-समृद्धी येते. सर्व प्रकारची दुःखे दूर होतात. या दिवसांत दहा महाविद्या केल्या जातात. ही साधना गुप्तपणे केली जाते, असे म्हटले जाते. तसेच असेही मानले जाते की, भाविकाने आपली साधना इतर कोणत्याही व्यक्तीला सांगितल्यास उपासनेचे परिणाम नष्ट होतात.
दुर्गादेवीसह देवीच्या अन्य स्वरुपांचे पूजन
गुप्त नवरात्री दरम्यान साधक महाविद्यासाठी काली, तारादेवी, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी माता, छिन्न माता, त्रिपुर भैरवी मा, धुमावती माता, बगलामुखी, मातंगी आणि कमला देवींचे पूजन करतात. तसेच इतर नवरात्रीप्रमाणे यात गुप्त नवरात्रीत व्रत, पूजन, पाठ, साधना केली जाते. या दरम्यान दुर्गा सहस्रनाम पाठ, दुर्गा चालीसा, दुर्गा सप्तशती पाठ केले जातात.