Ashadhi Devshayani Ekadashi 2023: भारतीय संस्कृती, परंपरा, सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांमध्ये एकादशीला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक मराठी महिन्यात दोन एकादशी येतात. ज्यावर्षी अधिक मास असेल, त्यावर्षी दोन एकादशी अधिक असतात. यंदाच्या चातुर्मासात तसा योग जुळून आला आहे. यावर्षी चातुर्मासातील श्रावण महिना अधिक आहे. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. या एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. सन २०२३ मध्ये २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. जाणून घेऊया शुभ मुहूर्त, महत्त्व आणि मान्यता...
आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरला जातात. मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून, उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो, अशी मान्यता आहे. आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते. म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, असे म्हटले जाते, असे सांगितले जाते. (Ashadhi Devshayani Ekadashi 2023 Significance)
आषाढी एकादशीचे महत्त्व
आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अतिशय वेगळे आहे. विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात दाखल होतात. राज्यातील विविध भागांतून लाखों वारकरी पायी पंढरपूरला जातात. संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला मार्गस्थ होतात. विठुनामाच्या गजरात तहान-भूक हरपून वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात. (Ashadhi Devshayani Ekadashi 2023 Date Time And Shubh Muhurat)
आषाढी एकादशीचा मुहूर्त
आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र, कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते. कार्तिक महिन्यात देवकार्ये सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते.
आषाढी देवशयनी एकादशी प्रारंभः गुरुवार, २९ जून २०२३ रोजी पहाटे ०३ वाजून १८ मिनिटे.
आषाढी देवशयनी एकादशी समाप्तीः शुक्रवार, २९ जून २०२३ रोजी मध्यरात्री ०२ वाजून ४१ मिनिटे.
आषाढी देवशयनी एकादशीची मान्यता
काही पुराणांमधील उल्लेखानुसार, श्रीविष्णूंनी वामन अवतार धारण करून बळी राजाला पाताळात धाडले होते. त्याचप्रमाणे बळी राजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले होते. बळी राजाला दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी श्रीविष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीचा मानण्यात आला आहे. श्रीविष्णू आषाढी एकादशीला बळीच्या राज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला स्वगृही क्षीरसागरात परतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे आषाढी एकादशी देवशयनी आणि कार्तिक एकादशी प्रबोधिनी नावाने ओळखली जाते. (Ashadhi Devshayani Ekadashi 2023 Vrat Puja Vidhi)
आषाढी एकादशीचा व्रतपूजाविधी
वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. आषाढी एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी आषाढी एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.