आज आषाढी एकादशी. शेकडो वर्षे चालत आलेल्या पंढरपूरच्या यात्रेचा आज परममंगल दिवस. पंढरीच्या रायाचे हे आकर्षण महाराष्ट्राच्या मातीने जीवाभावाने जपले आणि जोपासले आहे. मुळात श्री विठ्ठल कर्नाटकातून पंढरपुरी का आले? तर पुंडलिकाला भेटण्यासाठी. नामदेव महाराज सांगतात-
पुंडलिकाचे भेटी आणि भीवरेचे तटी,परब्रह्म उभे वाळुवंटी माये।।
हा विठुराया साधा दिसत असला, तरी वास्तविक हे प्रस्थ बरेच मोठे आहे.
अगणित गुण वर्णिती पुराणे, पंढरीचे राणे, ख्याती जगी।अलक्ष भेटी, लक्षिताची नाही, पुंडलिके काही, तप केले।युगे गेली अठ्ठावीस, ते अझुनी, उभा चक्रपाणी, राहिलीसी।वेद म्हणती नेति, पुराणे ते किती, भांबावल्या मती, म्हणे नामा।
साहजिकच या पंढरीचा थाट स्वर्गाहून कितीतरी अधिक आहे आणि तो तसा असणारच!
नामाचा गजर, गर्जे भीमातरी, महिमा साजे थोर, तुज एका।रिद्धि सिद्धी दासी, अंग झााडिती, उच्छिष्टी काढती, मुक्ती चारी।चारी वेद भाट, अंगणी लोळती,चरणरज क्षिती, शिव वंदी।नामा म्हणे देव, ऐसा हो कृपाळू,करितो संभाळू अनाथांचा।।
एरव्ही ज्याचे दर्शन ऋषी, मुनींनाही दुर्लभ, परंतु पंढरीत मात्र तो हमखास सापडतो. एकदा पंढरपुरात आपण भेटायला गेलो की हा भक्तवेडा पंढरीचा राणा प्रेमाचा वर्षाव करतो. त्याला भेटायला भक्तांची गर्दी होते. तरी तो गर्दीतल्या प्रत्येकाला भेटतो.
या पंढरपुराचे आणि पंढरीरायाचे महात्म्य किती वर्णावे? संतांनी त्याचे एवढे वर्णन करून ठेवले आहे, की प्रत्यक्ष पंढरपुरात जाता आले नाही, तरी डोळे बंद केले असता, मन थेट पांडुरंगाच्या समचरणांवर जाऊन पोहोचते. हे केवळ एकादशीलाच नाही, तर कोणत्याही क्षणी ही प्रचिती येते, फक्त आपली श्रद्धा दृढ हवी आणि त्या समचरणांवर निस्सिम प्रेम असायला हवे.
अशा रितीने आज आपलीही मानस दिंडी पूर्ण झाली.जय हरी विठ्ठल, श्रीहरी विठ्ठल!