आज आषाढी एकादशीचा दिवस. देहाने वारीत सहभागी होऊ न शकलेले वारकरीसुद्धा आज मनाने वारी करत पंढरपूरात पोहोचले असतील. तिथे गेल्यावर चंद्रभागेत स्नान करून, भक्त पुंडलिकाची भेट घेतल्यावर, पांडुरंगाच्या गाभाऱ्यात, भक्तांच्या गर्दीत दुरून अगदी क्षणभर झालेले पांडुरंगाचे दर्शन आनंदून टाकणारे आहे, ते सांगताना माऊलींच्या शब्दाचा आधार वाटतो.
रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी।तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा।बहुत सुकृताची जोडी, म्हणुनि विठ्ठली आवडी।सर्व सुखाचे आगर, बापरखुमादेवीवर।।
माऊलींच्या या रूपाच्या अभंगाला परंपरेत महत्वाचे स्थान आहे. अभंग संप्रदायातल्या प्रत्येकाला तो मुखोद्गत असतो. तुकोबांचा ध्यानाचा अभंग `सुंदर ते ध्यान' आणि माऊलींचा `रूप पाहता लोचनी' हा अभंग हरिपाठात नित्यनेमाने म्हटला जातो. या दोन्ही अभंगांचे वैशिष्ट असे, की रूपाच्या अभंगात रूपाचा उल्लेख नाही आणि ध्यानाच्या अभंगात नामाचा उल्लेख नाही. हे योगायोगाने घडले आहे. एवढी वर्षे हा अभंग म्हटला, गायला जात आहे.
संत ज्ञानेश्वर काय किंवा तुकोबा काय, दोघेही भक्तिप्रेमाचे मूर्तिमंत पुतळेच होते. त्यांचे श्वासोश्वास हेच मुळी अभंग होते त्याचे जगणे हा भगवंत भक्तीच्या प्रेमाचा अविष्कार होता. त्यांच्या प्रत्येक रचनेतून विठ्ठल भक्ती पाझरते आणि त्या अभंगाची गोडी आपल्याला सुखावून टाकते.
आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनाने पावन झालेला भक्त त्याच्या रूपाचे, नामाचे गोडवे गात गातच बाहेर पडला असता. वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दोन वर्षे खंड पडला. परंतु, जो खरा भक्त आहे, तो मनाने कधीच पंढरपुरात पोहोचला. ता राजस सुकुमारदेखील भक्ताच्या भेटीसाठी आसुसला होता. जीवाशिवाची भेट झाली, की भक्त आणि भगवंत हा भेद राहतोच कुठे? अशीच काहीशी परिस्थिती दर एकादशीला पहायला मिळते.
या विठ्ठलनामाची गोडी लागण्यासाठी आपले सुकृत चांगले असावे लागते. महाराष्ट्राचे सुकृत चांगले म्हणून हा विठ्ठल भक्तीचा ठेवा वारसा हक्काने आपल्याला मिळाला. आपणही ही परंपरा सुरू ठेवूया आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करूया. तूर्तास सर्व सुखाचे आगर असणाऱ्या पंढरीनाथाचे डोळे भरून रूप मनात साठवून घेऊया...जय हरी!