माझे माहेर पंढरी, अणुरेणिया थोकडा, इंद्रायणी काठी, टाळ बोले चिपळीला अशी शेकडो गाणी ज्या दैवी स्वराने अजरामर केली, तो सूर आहे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा. त्यांच्या सुरावटीत चिंम्ब भिजून भक्तिमय वातावरणात वारीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांची अभंगवाणी लावा आणि घरबसल्या वारीचे सौख्य मिळवा.
पं. भीमसेन जोशी हे शास्त्रीय गायक म्हणून, ते जगाला परिचित आहेतच, परंतु सर्वसामान्य जनाला ते परिचित आहेत, ते त्यांनी अजरामर केलेल्या अभंगवाणीमुळे! संतांच्या पश्चात सामान्यजनाला भक्तीमार्गाला लावण्यात त्यांच्या प्रासादिक सूराचे मोठे योगदान आहे. एवढेच काय, तर सकल संतांनाही आपल्या अभंगरचनांना भीमसेनीस्पर्श झाला, याचा निश्चितच आनंद असेल.
सकल संतांनी समाज प्रबोधनार्थ, समाज हितार्थ अभंगरचना केल्या. त्यांनी त्यांच्या परीने लोकांपर्यंत पोहोचवल्या. परंतु कलियुगात परिस्थती अशी आहे, की लोकांकडे ग्रंथ उघडून वाचण्याइतकीही फुरसत नाही. त्यामुळे संत गाथा मूक झाली होती. मात्र, तिला वाचा फोडली, ती याच भीमसेनी स्वराने! अन्य गायकांनीही अभंगवाणी गायली, परंतु भीमसेनजींच्या सूरात नामा म्हणे, तुका म्हणे, चोखा म्हणे, गात असताना जी अधिकारवाणी होती, ती क्वचितच अन्य गायकांच्या ठिकाणी ऐकू येईल.
भीमसेनजी गातात, ती प्रत्येक रचना आपली समजून गातात. एवढी आत्मियता, लगाव, समरसता त्यांच्या सूरातून स्पष्ट दिसून येते. माझे माहेर पंढरी म्हणताना, ही भावना संत एकनाथांची नसून भीमसेन जोशींचीच आहे की काय, असा विचार मनात डोकावतो. प्रत्येक सासुरवाशीण आपल्या माहेराबद्दल जेवढ्या आपुलकीने, अदबीने, व्याकुळतेने बोलते, कौतुक करते, तेच भाव माझी बहिण चंद्रभागा, पुंडलिक आहे बंधू, बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई, ही ओळख पटवून देताना भीमसेनजींच्या सूरातून जाणवतात.
कधीही, कुठलाही अभंग ऐका, मन प्रसन्न होणार याची शंभर टक्के हमी! त्याचे कारण म्हणजे, सतरा ते अठरा तास घोकून केलेला रियाज. मी आणि माझा तानपुरा, एवढेच त्यांचे विश्व. डोक्यात चोवीस तास संगीत आणि केवळ संगीतच. याचा अर्थ त्यांना बाकी गोष्टीत रस नव्हता असे नाही. परंतु, गायनसेवा हे ईश्वरी काम त्यांनी निष्ठेने केले. शिष्यांची फौज निर्माण न करता, ज्यांना गाण्याप्रती खरोखर आस्था आहे, असे मोजकेच शिष्य घडवले. हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीतावर अपार प्रेम केले. म्हणूनच 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' ही संत नामदेवांची अभंगरचना असो, नाहीतर 'सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा' ही पुरंदरदासांची कन्नड रचना असो, ऐकताना भाषेचा अडसर श्रोत्यांना जाणवत नाही. त्यातील भक्तीमय सूर मनाचा गाभारा व्यापून टाकतो.
शास्त्रीय संगीताचे ज्ञान नसणारा एखादा कानसेनदेखील, भीमसेनजींच्या गाण्यांवरून शास्त्रीय संगीताकडे आकर्षित होतो. हे सामर्थ्य त्यांच्या सुरावटीत होते, आहे आणि पुढेही राहील. तोच दैवी अनुभव वारीच्या निमित्ताने तुम्हीसुद्धा अवश्य घ्या, जेणेकरून तुम्हालाही प्रचिती येईल....
आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया...