आषाढी एकादशीपासून चतुर्मास सुरू होतो. यंदा १० जुलै पासून चातुर्मास सुरू होणार आहे. या चार महिन्यात देव विश्रांती घेतात अशी भक्तांची श्रद्धा असते. या काळात मंगलकार्ये केली जात नाहीत. देवाच्या अनुपस्थितीत मंगलकार्ये करू नये, हा भोळा आणि सच्चा भाव त्यामागे असतो. तरीदेखील पाऊस पाणी पुरेसे आल्यामुळे सर्वत्र सुबत्ता नांदते. उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण असते. त्या उत्साहाला दिशा मिळावी म्हणून नानाविध व्रतांची आखणी चतुर्मासात केलेली दिसते. त्याची सुरुवात होते गोंविदशयन व्रतापासून...
गोविंदशयन व्रत अर्थात देवशयनी एकादशीपासून देव चार महिने झोपी जातात, म्हणून देवाची व्यवस्था लावून देणारे व्रत. आजकाल हे व्रत घरोघरी केले जात नाही, परंतु पूर्वी घरातील ज्येष्ठ मंडळी विष्णूंच्या मूर्तीला देव्हाऱ्यात छोटीशी शेज रचून निजवत असत. ज्यांना हे व्रत करणे शक्य आहे, त्यांनी आषाढी एकादशीला व्रताला आरंभ करावा. चार महिन्यांचे हे व्रत वैष्णव संप्रदायातील बरीच मंडळी वैयक्तिक रीतीनेही करतात. प्रामुख्याने ते विष्णुमंदिरात केले जाते. आषाढ शुक्ल एकादशीला पूजेतील विष्णूमूर्ती शय्येवर निजवावी. त्यानंतर कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चार महिने विवाह, मुंज, नवीन घरातील प्रवेश अशी कोणतीही मंगलकार्ये केली जात नाहीत.
गुजराती वैष्णव बांधवामंध्ये इतर वेळीही देवाला रात्री पडदा लावून विश्रांती देतात. या व्रतामागे केवळ भोळा भक्तीभाव आहे. आपल्याला जशी विश्रांतीची गरज असते, तशी विश्वाचा पसारा सांभाळणाऱ्या देवालाही विश्रांती मिळावी हा भाग त्यामागे असतो. यालाच गोविंदशयन व्रत म्हणतात. त्याबरोबरीने चतुर्मासात आणखीही अनेक व्रते दिलेली आहेत, त्याचा आरंभ आषाढी एकादशीपासून होतो.
आजही चातुर्मासात बहुसंख्य मंडळी काटेकोरपणे सर्व प्रथा सांभाळताना दिसतात. वास्तविक पूर्वीच्या काळी पावसाळ्यात दळणवळणाचे सर्व मार्ग बंद होत असत. प्रवास करणे अतिशय त्रासदायक व धोकादायक ठरत असे. शिवाय आपला देश कृषिप्रधान असल्यामुळे हे चार महिने शेतीची कामे करण्याची धांदल उडत असे. त्या कामातून सवड काढून लग्नकार्याला जाणे कोणालाच शक्य होत नसे. म्हणून हे चार महिने माणसांच्या सर्व शुभकार्यांसाठी निषिद्ध ठरवले गेले. तर देवकार्यासाठी, धर्मकार्यासाठी उत्तम मानले गेले. त्यामुळे श्रावणात व्रत वैकल्ये सांगितली गेली.
आषाढीच्या वारीनंतर प्रवास टाळण्याकडे सर्वांचा कल असला तरी घरी राहून, गावातल्या देवळात, शेजारीपाजारी व्रत, सण, उत्सव साजरे करणे सोयीचे असल्याने नागपंचमी, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, बैलपोळा, पिठोरी अमावस्या हे सारे सणवार हौसेने केले जाऊ लागले. गणपतीच्या आगमनाच्या काळी नांगरणी, पेरणी ही मुख्य कामे पूर्ण झालेली असतात. पाऊसपाणी चांगले झाल्याने सणाला उत्सवाचे रूप येते. या साऱ्या गोष्टींचा विचार करून धर्माची आपल्या जीवनाशी, व्रत वैकल्यांशी घातलेली सांगड मन थक्क करणारी तसेच आनंददायी, अभिमानास्पद आहे, यात शंका नाही.