हिंदू धर्मात केशरी, लाल, पांढरा, पिवळा या रंगाचा अधिकतर वापर केला जातो. हिंदू सण उत्सवातही भगव्या ध्वजाचे पूजन केले जाते, भगवी पताका लावली जाते आणि विशेषतः आषाढी-कार्तिकी एकादशीच्या वारीत भगवा ध्वज उंचावत वारकरी पंढरीची वाट चालतात. पण भगवाच का? या रंगाचे हिंदू धर्मात असलेले महत्त्व जाणून घेऊ.
केशरी अर्थात भगवा रंग त्याग, बलिदान, ज्ञान, पावित्र्य, सेवा यांचे प्रतीक आहे. सनातन धर्मात साधू संत मुुमुक्षू होऊन मोक्ष मार्गावर चालण्याचा संकल्प करतात, तेव्हाही केशरी वस्त्रे परिधान करतात. वारकरी पंथातही केशरी ध्वज उंचावतात.
केशरी वस्त्र संयम, संकल्प आणि आत्मनियंत्रणाचे प्रतीक मानला जातो. ज्याप्रमाणे पवित्र अग्नी प्रज्वलित झाल्यावर त्यातून केशरी ज्वाला निघतात, त्याप्रमाणे साधू संत आपल्या तपश्चर्येच्या तेजाने तप्त होतात, तेव्हा त्यांची काया केशरी रंगासमान भासते.
केशरी रंग दुर्गा माता, हनुमंत, गणपतीदेखील धारण करतात. त्यामुळे या रंगाबरोबरच त्यांची ऊर्जा आणि आशीर्वाद प्राप्त होतात. रामायण, महाभारत असो नाहीतर शिवरायांचा काळ, त्या सर्वांनी विजयाचा निदर्शक म्हणून भगवा ध्वज फडकवला. सनातन धर्मानेदेखील भगवा ध्वज स्वीकारला. तर स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या ध्वजातही केशरी रंग वापरण्यात आला.
अंधारातही चमकून दिसेल, ही केशरी रंगाची खासियत असते. म्हणून द्रुतगती मार्गावर केशरी रंगाचे पट्टे रेखाटले असतात. याचाच दुसरा अर्थ केशरी रंग अंधारावर, अधर्मावर, अंधश्रद्धेवर मात करणारा आहे, म्हणून केशरी ध्वजाचा वापर होतो.
केशरी हा सूर्योदयाचादेखील रंग आहे. सूर्य आणि पृथ्वी यांचे घनिष्ट नाते आहे. सूर्योदय झाल्याशिवाय पृथ्वीचे कामकाज सुरू होत नाही, त्याप्रमाणे धर्माचा उदय झाल्याशिवाय समाज जीवनाचे चलनवलन होणार नाही. म्हणून हिंदू धर्माचा ध्वज केशरी रंगाचा आहे. केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरतेचे प्रतीक आहे. तसेच तो मांगल्याचेही प्रतीक आहे. म्हणून वारीच्या मंगलमयी उत्सवात भगवा ध्वज फडकवत पंढरपूरच्या दिशेने कूच केली जाते.