Ashadhi Ekadashi 2024 Mantra: महाराष्ट्र तसेच आंध्र-कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातील भागवत धर्म वा संप्रदाय म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वारकरी संप्रदायाचे उपात्य दैवत म्हणजे विठ्ठल. हे दैवत विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ अशा अन्य नावांनी प्रसिद्ध आहे. आषाढ महिन्याच्या एकादशीला पंढरपूरमध्ये वैष्णवांचा मेळा असतो. आषाढी वारीला भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये वेगळे महत्त्व आहे. बुधवार, १७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी आहे.
आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी आहे. या दिवशी लाखो वारकरी पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतात. राज्यभरातून निघालेल्या संतांच्या पालख्या आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात. विठुरायाच्या दर्शनाने तृप्त झाल्यानंतर वारकरी माघारी परततात. विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले. काही मान्यतांनुसार, अज्ञ जनांना ज्ञानाने स्विकारणारा, तो विठ्ठल, अशी एक व्युत्पत्ती या नावाची केली जाते. जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे, तो विठ्ठल, असेही म्हटले जाते. विठ्ठल हा ‘युगे अठ्ठावीस’ पंढरपुरी विटेवर उभा आहे, असे म्हटले जाते.
कलयुगात नामसाधना, नामस्मरण, नामाचा जप याला सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचे नामस्मरण, विठ्ठल नामाचा जप करणे शुभ तसेच लाभदायी मानले गेले आहे. वारकऱ्यांसह लाखो भाविक या दिवशी विशेष करून विठ्ठलाचे भजन, पूजन, कीर्तन नामस्मरण करतात. विठ्ठल नामात प्रचंड मोठी शक्ती असून, हे अत्यंत प्रभावी मानले गेले आहे. विठ्ठल नामाचा महिमा आणि महात्म्य अगाध असल्याचे म्हटले जाते. काही तज्ज्ञांनी, मान्यवरांनी विठ्ठलाचे वर्णन एक महासमन्वयक असा केल्याचे सांगितले जाते. विठ्ठलाच्या नामाबाबत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की,
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा। करी पापा निर्मूळ॥भाग्यवंता छंद मनी। कोड कानीं ऐकती॥विठ्ठल हे दैवत भोळे। चाड काळे न धरावी॥तुका म्हणे भलते याती। विठ्ठल चिती तो धन्य॥
विठ्ठलाचा गायत्री मंत्र
ॐ भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि ।तन्नो कृष्ण: प्रचोदयात् ।।
तुळस गायत्री मंत्र
ॐ तुलसीदेव्ये च विद्महे विष्णुप्रियायै च धीमहि ।तन्नो कृष्ण: प्रचोदयात् ।।
हरि ॐ विठ्ठलाय नम:
जय जय 'राम कृष्ण हरि'विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल