विठ्ठल म्हटल्यावर रखुमाईचे नाव ओघाने येते, तरी संत नामदेवांनी रचलेल्या 'युगे अठ्ठावीस' या आरतीत 'राही रखुमाबाई राणिया सकळा' असा उल्लेख येतो. पांडुरंगाच्या आणखी राण्या आपल्या ऐकिवात नाही, मग हा उल्लेख आला कुठून? त्याबद्दल जाणून घेऊ.
पांडुरंग, विठ्ठल हे विष्णूंचे रूप आणि महाभारतात श्रीकृष्ण अवतार झाल्यावर थकलेल्या भगवंतांनी चंद्रभागेच्या तीरी येऊन विश्रांती घ्यावी, भक्तांची भेट घ्यावी या विचाराने विठ्ठल रूप घेतले, तर तिथे त्याला भक्ताच्या भेटीसाठी तिष्ठत उभे राहावे लागले. कारण त्याचा भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. ती झाल्याशिवाय तो भगवंताची भेट घेणार नव्हता. उठून देवाला आसन द्यावे, एवढाही त्याच्याजवळ वेळ नव्हता, म्हणून त्याने जवळच पडलेली वीट पुढे सरकवली आणि तेच आसन म्हणून त्यावर थोडं टेकून घे असे सांगितले. त्याचीच वाट बघत पांडुरंग अठ्ठावीस युगे लोटली तरी तिथेच तिष्ठत उभा आहे. अशा वेळी तो परत आला नाही म्हणून 'गेला माधव कुणीकडे' हे पाहण्यासाठी त्याच्या गोपिका पंढरपुरापर्यंत आल्या.
राही कोण?
राही म्हणजे कृष्ण अवतारातली कृष्ण सखी राधा! तिलाच भगवंताने प्रेमाने राही हे नाव दिले आणि तिचा अपभ्रंश करत आपण तिला राई करून टाकले. मात्र ही राधा रुख्मिणीच्या पाठोपाठ पंढरपुरात आली आणि अन्य गोपिका सुद्धा तिथे पोहोचल्या. भक्त-भगवंतामधील अतूट प्रेम पाहून त्या भारावून गेल्या. त्याच या राणिया सकळा म्हणजेच कृष्णाच्या समस्त गोपिका!
तरी विठ्ठल रुख्मिणीचे मंदिर वेगवेगळे का?
विष्णू लक्ष्मी हे जोडपे वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते. त्यांचाही संसार आहे, फक्त तो विश्वाचा संसार आहे. त्यामुळे त्यांच्यातही वाद विवाद होत राहतात. अशातच श्रीकृष्ण रूपात राधाशी असलेली जवळीक रुख्मिणीला खटकते, म्हणून ती विठ्ठल रूपातल्या कृष्णाला शोधत पंढरपुरापर्यंत आली पण राही अर्थात राधाही तिथे आलेली पाहून दूरवर उभी राहून आपल्या भगवंताला न्याहाळत आहे. म्हणून भक्तांनी त्यांच्यातील मतभेदाचा आदर ठेवून एकाच ठिकाणी दोहोंचे मंदिर उभारले पण ते स्वतंत्र ठेवले.
हा रुसवाही लोभस वाटावा इतका गोड आहे. आपल्या पतीवर अन्य कोणी प्रेम केलेले कोणत्याही पत्नीला आवडणार नाही, यात रुख्मिणी मातेचा तर दोष नाहीच, पण राजस सुकुमार असणाऱ्या भोळ्या विठ्ठलाचाही दोष नाही; कारण देही असोनि विदेही अर्थात अलिप्त राहणारे हे ईश्वर तत्व आहे. त्याच्या मायेत आपण सगळे गुंतून गेलेलो आहोत... जय हरी विठ्ठल!