आपल्याकडे काय नाही याची यादी आपल्याकडे नेहमीच तयार असते, मात्र ती यादी न संपणारी असते. त्याऐवजी असे कोणते मागणे आहे, जे मागितले असता आपोआपच इतर इच्छादेखील न मागता पूर्ण होतील किंवा इतर काही मागावे अशी इच्छाच उरणार नाही? त्यासाठी दिलेली प्रार्थना वाचा आणि रोज देवासमोर हेच मागणे मागा, अन्य काही मागण्याची इच्छाच उरणार नाही!
गळ्यामधे माळ दे, हाता मध्ये टाळ दे।देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे॥ संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे।तुझे गीत गाता यावे असे वरदान दे॥ मायेसाठी माय दे, वारी साठी पाय दे।तुझी कृपा कामधेनू, अशी एक गाय दे॥ दिवस भर काम दे, पोटापुरता दाम दे।चिंता दूर करावया ओठी तुझे नाम दे॥ कष्ट आणि चारा दे, सोसायाला जोर दे। खांद्यावर देवा, तुझ्या पालखीचा भार दे॥
ध्रुवापरी स्थान दे, कर्णापरी दान दे।श्रावणाच्या सेवेपरी थोडसं ईमान दे॥
तुकोबाची वीणा दे, ज्ञानियाची करुणा दे।मूर्त डोळा, पायी माथा ठेवुनीया मरणा दे॥
मागू किती राहू दे, सारे एके ठायी शोभु दे।वाट दाखवण्या गुरू, जन्मो जन्मी लाभू दे॥