दही किंवा ताक हा भारतीय आहार पद्धतीचा अविभाज्य भाग असतो. पूर्वीचे लोक तर म्हणायचे, 'दही नाही तिथे काही नाही' म्हणजे दह्याला एवढे महत्त्व होते. ते शुभ मानले जाते, एवढेच नाही तर महत्त्वाच्या कामाला जाताना दही साखरही दिले जाते. त्याचे आरोग्यदायी गुणधर्म तर आपण जाणतोच, शिवाय त्यापासून बनवलेले ताक देखील अत्यंत गुणकारी मानले जाते. म्हणून दही किंवा ताक प्यायल्या नंतर ती वाटी लगेच घासायला टाकून न देता त्यात पाणी घालून त्याचा प्रत्येक कण पोटात घ्यावा असे शास्त्र सांगते. तसे न केल्यास होणारा कुंडली दोष आणि त्याच्याशी जोडलेली रामकथाही जाणून घेऊ.
यामागील रामकथा :
रामकथेत अशी गोष्ट सांगितली जाते, की एकदा हनुमंत सीता माईच्या शोधात लंकेत गेले होते. तिथे ते रावणाच्या पाकगृहात पोहोचले. तिथे खरकटी भांडी होती. त्या ताटांपैकी एक भले मोठे सोन्याचे ताट रावणाचे होते. त्यात सगळे पदार्थ चाटून पुसून संपवले होते, फक्त दह्याची वाटी स्वच्छ केली नव्हती. ती पाहता हनुमंताने ओळखले, की रावणाचा मृत्यू समीप आला आहे.
या रामकथेवरून दह्याचे महत्त्व अधोरेखित होते. आणि रावणाचा मृत्यू समीप यासाठी म्हटलं आहे, कारण दह्याची नासाडी करणारी व्यक्ती मुजोर वृत्तीची असते. ती व्यक्ती आपल्याच कृत्याने ताण तणाव ओढवून घेते आणि तणावग्रस्त जीवन जगते. हनुमंताचे भाकीत खरे ठरले. रामावर विजय मिळवण्याचा ध्यास घेतलेल्या रावणाला मृत्यूला सामोरे जावे लागले.
कुंडली दोष :
दही, दूध, तूप, लोणी, ताक हे वैभवाचे प्रतीक मानले जाते, त्याची नासाडी म्हणजे आपणच आपल्या कुंडलीत निर्माण केलेला दोष! ज्योतिष शास्त्रानुसार हे वैभव ज्या चंद्र देवतेच्या कृपेमुळे प्राप्त होते, ती देवता या कृतीमुळे रुष्ट होते, परिणामी कुंडलीत चंद्र दोष निर्माण होतो, आयुर्मान कमी होते आणि व्यक्ती तणावग्रस्त आयुष्य जगते.