नक्षत्रांमुळे पावसाचा अंदाज किती अचूक असू शकतो, हे पंचांगातील वार्षिक भविष्य वाचल्यावर लक्षात येईल. ग्रह ताऱ्यांचा सखोल अभ्यास करून तारखेनिशी केलेले भाकीत वाचल्यावर अचंबित व्हायला होते. असाच एक अनुभव गेल्या दोन दिवसांत पुनश्च घेतला.
दाते पंचांगातील वार्षिक भाकिताचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्यात दिलेल्या माहितीनुसार १९ जुलै रोजी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहेत. त्यावेळी मीन लग्न व वरुणमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन पर्जन्यसूचक बेडूक असून रवी, बुध, शुक्र, शनी हे जलनाडीत आहेत. या नक्षत्रात पाऊस चांगला पडेल. पूर, अतिवृष्टीची शक्यता आहे. २१-२५, ३०-३१ पाऊस अपेक्षित आहे.
यानुसार २१ ते २५ या कालावधीत पूरजन्य परिस्थिती येईपर्यंत राज्यात सर्वत्र पाऊस पडला आणि २५ जुलैच्या रात्रीपासून पाऊस हळू हळू ओसरू लागला. आता ३०, ३१ ला काय परिस्थिती असेल ते पाहूच.
ज्योतिष शास्त्रातही त्यात चमत्काराचा भाग नाही, तर तो खगोल शास्त्राचा अभ्यास आहे. कोणती ग्रहदशा कशी परिणाम करते याचा वर्षानुवर्षांचा अभ्यास आहे. त्याआधारे अभ्यास केलेले ज्योतिषी आपल्याला भाकीत वर्तवतात. ज्यांचा सखोल अभ्यास असतो, जे लोक हे शास्त्र शिकताना आणि सांगताना पावित्र्य ठेवतात, त्यांचे शब्द खरे ठरतात असा अनेक भाविकांना अनुभव आहे. ती एकार्थी तपश्चर्या आहे. त्यामुळे त्यात अविश्वसनीय असे काहीच नाही.
ज्याप्रमाणे पूर्वीचे वैद्य नाडी परीक्षा करून तर काही जण रूग्णांच्या नुसत्या चालण्या बोलण्यावरून काय आजार झाला असावा हे अचूक ओळखायचे. यामागे त्यांनी घेतलेले परिश्रम असत. ज्योतिष शास्त्राबाबतीतही तेच आहे. म्हणून ज्या ज्योतिष तज्ज्ञांनी या शास्त्राचा अभ्यास केला, लोक त्यांच्याकडे आपली समस्यां घेऊन जात असत. जेणेकरून उपाय जाणून घेता यावा, दिलासा मिळावा आणि सकारात्मकता वाढावी, हा त्यामागील हेतू असे.
आजही ज्योतिषी उपाय सांगतात, मार्गदर्शन करतात, पण दावा करत नाहीत, तर शक्यता वर्तवतात. म्हणून आजही अनेक घरांमध्ये गुढी पाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन केले जाते. जेणेकरून वर्षभरातील प्रमुख घडामोडींचा अंदाज घेता येतो. शुभ मुहूर्त कळतात. सण-वार-उत्सव -जयंती-पुण्यतिथी-पितृपक्षाचा काळ या सर्वांची माहिती मिळते. पूजा विधी कळतात. सणांचे महत्त्व कळते. असे अनेक लाभ पंचांग वाचनामुळे होतात. नासाचे वैज्ञानिक देखील खगोल शास्त्रीय अंदाज घेण्याकरिता पंचांग वाचन करतात असे सांगितले जाते. तर मग सहज कुतूहल म्हणून का होईना, तुम्ही पंचांग वाचनाचा अनुभव कधी घेताय?