>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
माणसाच्या आयुष्यातील यश आणि अपयश ऊन पावसासारखे असते . अनेकदा यशाची खात्री असताना जेव्हा अपयश येते तेव्हा ते पचवता येत नाही . कारण आपण सगळ नेहमी गृहीत धरतो . सगळ्यांनी आपल्याच मनासारखे वागले पाहिजे असे आपल्याला वाटत असते . प्रत्येक गोष्टीत आपल्याच मनाचा विचार झाला पाहिजे , जे हवे ते अगदी नियतीने सुद्धा उपलब्ध करून दिले पाहिजे अशी आपली अपेक्षा नाही अट्टाहास असतो . नेमके इथेच गणित बिघडते .
एकदा यशाच्या पायऱ्या चढायला लागलो की पुढे त्या पायऱ्या फक्त आणि फक्त यशाकडेच नेणार हा आपला भ्रम असतो आणि तो भोपळा फुटतो तेव्हा आपण हतबल होतो. यश अपयश ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत . त्या दोन्हीची चव आयुष्यात चाखायची तयारी ठेवावी लागते . प्रत्येक आईला वाटत असते माझा मुलगा शाळेत पहिल्या पाचात तरी यावा . ह्या आणि अश्या अनेक अपेक्षा आपण आपल्यावर आणि समोरच्यावर आपल्याही नकळत पणे लादत असतो .
आयुष्यात अपयश हे खूप लवकर यावे ह्या मताची मी आहे कारण तेव्हाच आपल्याला यशाची किंमत कळते आणि आपण ते मिळवण्यासाठी अधिक मेहनत करतो . सतत यश मिळत गेले तर मग आलेले अपयश आपल्याला सहज पचवता येत नाही.
केलेल्या मेहनतीला सुद्धा न्याय मिळवून देणारी असते ती आपल्या जन्माची ग्रहस्थिती. अनेकदा आपले अपमान होतात , कष्ट करून धन मिळत नाही , आनंद उपभोगता येत नाही , कुठेतरी काहीतरी राहून गेल्याची उणीव सतत भासत राहते . आणि मग हेच माझे जीवन असणार का असे मनात येणे हे स्वाभाविक आहे. आपले प्रारब्ध आहे ते.
ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज ह्यांच्यासारख्या थोर संतांचे शिक्षण प्रख्यात विद्यालयात झाले नव्हते पण आज त्यांच्या ओव्या आणि दोह्या वर लोक PhD करत आहेत . दिवसातील आठ तास काम करणाऱ्या एकाला महिना १० हजार मिळतात तर दुसरा एखादा त्याच आठ तासात २ लाख सुद्धा कमावतो . आपल्याला जे मिळत आहे ते त्यांच्या कृपेने आणि त्यात समाधान मानले तर यशापयाशाच्याही खूप पुढे जावू आपण .
आपल्या जे मिळत नाही ते दुसऱ्याला मिळाले की त्यातून मग मत्सर , इर्षा , द्वेष ह्या भावना उदयाला येतात पण त्या अर्थहीन असतात . ह्या भावना यशा पर्यंत नेणार नाहीच पण मिळालेले यश सुद्धा टिकू देणार नाहीत .
आपले मन सतत काश्याच्यातरी मागे धावत असते , अजून पैसा , मोठे घर गाडी , सगळे अजून अजून हवे असते . नेमके कशाच्या मागे धावत असतो हे आपल्याला सुद्धा समजत नाही . कुठे थांबायचे हेच समजत नसते कारण यशाची धुंदी आणि अपयश पचवायची भीती .
ह्या जीवघेण्या स्पर्धेत मग मत्सर , हेवेदावे येतात आणि अनेक नात्यांना समाधी मिळते . यशाच्या उत्तुंग शिखरावर तो आनंद साजरा करायला मग आपण एकटेच असतो . ह्यासाठी कुठे थांबायचे ते समजले पाहिजे . आता मीही इथेच पूर्णविराम देते .
संपर्क : 8104639230