लोकांना वाटते, की ज्योतिषशास्त्र हे केवळ आपले भूत, वर्तमान आणि भविष्य सांगते. परंतु, ज्योतिषशास्त्रात आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीतही अनेक बाबींचा समावेश असतो. अनेक समस्यांवर उपाय दिलेले असतात. तुमच्या राहणीमानापासून ते आहारशैलीपर्यंत सर्व गोष्टींचा ग्रहमानावर परिणाम होतो. तुम्ही सेवन करत असलेले अन्न, तुमच्या ग्रहस्थितींवर अनुकूल आणि प्रतिकुल परिणाम करतात. इथे आम्ही तुम्हाला 'फूड अॅस्ट्रॉलॉजी' अर्थात 'खाद्य ज्योतिषशास्त्र' याबद्दल माहिती देणार आहोत. ही माहिती वाचून तुम्ही तुमच्या राशीला अनुकूल आणि प्रभावी ठरणारे अन्न सेवन करू शकता.
काय आहे खाद्य ज्योतिषशास्त्र?
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशी विशिष्ट प्रकारच्या खाद्यसवयींशी जोडलेली असते. त्या सवयींचा तुमच्या जीवनशैलीवर प्रभाव पडतो. आपण सेवन करत असलेल्या अन्नाचा आपल्यावर योग्य प्रभाव पडावा, यासाठी ज्योतिषशास्त्राचा घेतलेला आधार, यालाच `खाद्य ज्योतिषशास्त्र' असे म्हणतात. कोणत्या राशीच्या लोकांनी काय खाल्ले पाहिजे आणि काय नाही, यासंबंधी सर्व माहिती खाद्य ज्योतिषशास्त्रात दिलेली आहे.
भोजनाचे प्रकार आणि प्रभाव
अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मुलभूत गरजा आहेत, परंतु हवा, पाणी आणि भोजन यांशिवाय आपण जीवंत राहू शकणार नाही. त्या तीन गोष्टींपैकी हवा आणि पाणी मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागत नाही. मात्र, अन्न मिळवण्यासाठी धडपडावे लागते. तरच, आपण आपल्या आवडीचे अन्न निवडू शकतो.
श्रीमद्भगवद्गीतेत भोजनाचे तीन प्रकार सांगितले आहेत- १. सात्विक २. राजस ३. तामस
या तीनही प्रकारच्या भोजनांची विस्तृत माहिती आपण पौराणिक कथांमधून मिळवू शकतो. खाद्य ज्योतिषशास्त्रानेदेखील अन्न वर्गवारी करताना वरील तीन श्रेणींच्या अंतर्गत विभागणी केली आहे. शाकाहारी जेवणात सात्विक गुण असतात. तर मांसाहारी जेवणात तामस गुण असतात आणि ज्यांच्या जेवणात दोन्ही प्रकारांचा समावेश असतो, त्याला आहारात राजस गुण असतात. ज्याला आपण `तब्येतीत' खाणे असेही म्हणतो.
सात्विक आहार तुम्हाला आध्यात्म आणि शांतीमय जीवनाकडे नेईल, तर तामस आहार तुमची वृती अशांत, अस्थिर, हिंसक बनवेल. राजस आहार, ऐषारामी जीवनासाठी प्रवृत्त करेल. अर्थात तुमचे जन्मस्थान आणि भौगोलिक गोष्टी यावरही आहार रचना अवलंबून असते. परंतु, आपल्या प्रकृतीला मानवेल, अशा पद्धतीने आहारशैलीत बदल केला पाहिजे.
राशीनुसार निवडा आपली आहारशैली :
मेष : मसूर डाळ, बेसन, गहू यांचा जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे.
वृषभ : दही, दूध, तांदूळ यांपासून बनवलेले अन्नपदार्थ खावेत.
मिथून : सर्व प्रकारच्या डाळी, गहू, हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत.
कर्क : दही, दूध, तूप, तांदूळ अशा पांढऱ्या पदार्थांचे अधिक सेवन करावे.
सिंह : तूर, मसूर डाळींचा, तांदूळाचा आहारात समावेश करावा.
कन्या : मूग, गहू, हिरव्या भाज्या फलदायी आहेत.
तूळ : तांदूळ, दही, दूध यांपासून बनलेले पांढरे पदार्थ सेवन करावे.
वृश्चिक : मसूर, बेसन, गहू यांचा आहारात अधिक समावेश करावा.
धनु : तूर, चणा डाळ, गूळ हे पदार्थ लाभदायक.
मकर : उडीद डाळीचा आपल्या आहारात जास्तीत जास्त समावेश करावा.
कुंभ: ठराविक प्रमाणात तळलेले पदार्थ खावेत, तसेच उडीद डाळीचाही जेवणात समावेश करावा.
मीन : तूर आणि चणा डाळ लाभदायक.