सुखकर्ता दुःखहर्ता असणारा बाप्पा हा बुद्धीदातादेखील आहे. त्याने आपल्याला बुद्धी दिली आहे, पण तिचा यथायोग्य वापर कसा आणि कुठे करावा, जेणेकरून आपापल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होता येईल, ते जाणून घेऊ. त्यासाठी ज्योतिष शास्त्राने बुधवारी करता येतील असे प्रभावी उपाय दिले आहेत, ज्यामुळे गणेश कृपा होऊन आपला यशप्राप्तीचा मार्ग खुला होईल. त्यासाठी दिलेले उपाय करा!
गणेशाला दुर्वा आवडतात, पण...
ज्योतिष शास्त्रानुसार बुधवारी बाप्पाची पूजा करा आणि त्याच वेळी दूर्वांबरोबरच शमीची पानेदेखील अर्पण करा. यासाठी २१ दुर्वांची जुडी तयार करा आणि बाप्पाच्या पायाशी अर्पण करा. त्याचबरोबर शमीची पाने मिळाल्यास तीदेखील अर्पण करा, शमी ही देखील बाप्पाची आवडती वनस्पती आहे हे लक्षात ठेवा.
गोसेवा :
हिंदू धर्मात गाईला आई म्हटले जाते. असे मानले जाते की गायीमध्ये ३३ कोटी देवी-देवता वास करतात. बुधवारी गणेश सेवेबरोबरच गोसेवा केल्याचा लाभ होतो. ही सेवा कशी करावी? तर गायीला हिरवा चारा खाऊ घालावा, गोशाळेत जी सेवा आवश्यक असेल ती सेवा करावी. कधी श्रमदान करावे, तर कधी आर्थिक दान करावे. यथाशक्ती सेवा केल्याने लाभ होतो. मात्र त्यात सातत्य हवे हे नक्की! हा उपाय दर बुधवारी कमीत कमी तीन महिने करावा.
बुधवारसाठी इतर उपाय :
>> बुधवारी गरजू व्यक्तीला हिरवी मूग डाळ दान करणे फायदेशीर ठरते.
>> बुधवारी हिरव्या मूग डाळीचे पदार्थ करून दान केल्यास कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती मजबूत होऊ लागते.
>> जर तुम्ही बुधवारी शिवलिंगावर दूध पाण्याचा अभिषेक केलात, तर त्याचेही चांगले फळ लवकरच प्राप्त होते.
याशिवाय पुढे दिलेल्या मंत्रांपैकी एक मंत्र निवडून १०८ वेळा त्याचा जप करावा :
>> ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः!
>> ॐ बुं बुधाय नमः अथवा ॐ ऐं श्रीं श्रीं बुधाय नमः!
>> बुध देवाचा गायत्री मंत्र- ॐ सौम्यरुपाय विद्महे वाणेशाय धीमहि तन्नौ सौम्यः प्रचोदयात्।।
कुंडलीतील बुधाचे स्थान चांगले व्हावे, म्हणून दिवसातून ३ वेळा या मंत्रांचा जप करा असे ज्योतिषी सुचवतात. जेव्हा बुध बलवान असतो तेव्हा व्यक्ती शिक्षण , नोकरी, व्यवसायात उत्तम कामगिरी बजावते.